केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दहा हजार स्वॅबची तपासणी शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने आणि कोरोना चाचणीच्या पद्धती बदलल्याने कोरोना संसर्गितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्याचबरोबर बरे होणाऱया रुग्णांची संख्याही वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील विविध शहरांमध्ये 66 नव्या कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीस मान्यता दिली असून यातून दररोज सुमारे 10 हजार स्वॅब नमुन्यांची चाचणी घेतली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.
दिवसात 4833 रुग्ण बरे झाले
दरम्यान, कोरोना प्रभावित देशांच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानावर गेला आहे. दिवसात 9887 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 236657 झाली आहे. तर 4833 रुग्णांना दिवसात डिस्चार्ज दिला असून 114073 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 1 लाख 15 हजार 942 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी संपलेल्या 24 तासांमध्ये 294 जणांचा मृत्यु झाला असून यात सर्वाधिक मृत्यु महाराष्ट्रात 134 आहेत. मृतांची एकूण संख्या 6642 झाली आहे.
6 दिवसांत 66 नव्या लॅब
1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रुग्णसंख्येत कमाल वाढ होऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन उपचार वेगाने देणे शक्य व्हावे याकरता देशातील विविध भागांमध्ये 66 तपासणी प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. येत्या सहा दिवसांमध्ये त्याची उभारणी केली जाईल. या सर्व प्रयोगशाळांना स्वॅब तपासणीची अत्याधुनिक यंत्रणा पुरवली जाणार असून संबंधित ठिकाणी काही कर्मचाऱयांना तातडीने याबाबत खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व लॅबमध्ये मिळून दररोज सुमारे 10 हजार स्वॅब तपासले जाऊ शकतात. यामुळे रुग्णावर वेळेत उपचार करुन त्यांचे प्राण वाचवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इडीच्या कार्यालयात 5 संसर्गित
अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्ली मुख्यालयामध्ये कोरोनाचा 5 जणांना संगर्स झाला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर कार्यालय तातडीने तीन दिवसांकरता बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. त्या पाचजणांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतही रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. आयटीबीटमध्येही तीन नवे रुग्ण आढळले आहेत. येथील उपचार सुरु असणाऱया रुग्णांची संख्या 34 असून 144 जवान बरे झाले आहेत. तर कोलकात्तामध्ये दोन महापालिकदंडाधिकाऱयांना लागण झाले आहे.









