ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. हा प्रश्न भारताला शांततेच्या मार्गाने सोडवायचा आहे. मात्र, चीनने दगाबाजी केल्यास देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आमचे सैन्य खंबीरपणे उभे आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना केले.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाही अनेकदा चीनने नियंत्रण रेषेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने वेळीच कारवाई केल्याने चीन अयशस्वी ठरला.
सीमा वादावर जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही, असे 1993 आणि 1996 मध्ये दोन्ही देशात झालेल्या करारात म्हटले आहे. तसेच तणावाच्या काळात दोन्ही देश LAC जवळ सैन्याची तैनाती कमी ठेवतील, असेही त्यात म्हटले आहे. मात्र, तणावाच्या काळात चीन नियंत्रण रेषेजवळ सैन्याची तैनाती वाढवून द्विपक्षीय कराराचा अनादर करत आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.









