3 दुकाने खाक, 17 लाखाची हानी
प्रतिनिधी/ देवरुख
देवरूख बाजारपेठेत शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत तीन दुकाने खाक झाली. ही घटना 8 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महसूल विभागाच्या वतीने सोमवारी या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून 17 लाख 24 हजार 100 रूपयांची हानी झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. नगर पंचायतीमध्ये अग्निशामक बंब नसल्याने नुकसानीचा आकडा वाढल्याचे बोलले जात आहे.
प्रवीण पागार यांचे किराणा, दीपक येडगे यांचे भाजीपाला दुकान तर अमरेश चौधरी यांची बेकरी यांच्या दुकानाचे नुकसान झाले.प्रवीण वासुदेव पागार यांचे 13 लाख 10 हजार रूपये, निलेश नंदकुमार बेर्डे यांचे 70 हजार 600 रूपये, अमरेश चौधरी यांचे 3 लाख 33 हजार 500 रूपये व विकास यशवंत बेर्डे यांचे 10 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठत रविवारी मध्यरात्री या बंद दुकानांना आग लागली. रविवारी सहय़ाद्रीनगर, साडवली येथे कार्यक्रम असल्याने मार्गावरून नागरिकांची ये- जा सुरू होती. यामुळे आग लागल्याची घटना वाहन चालकांच्या निदर्शनास आली.

फवारण्यासाठी मागवले पाण्याचे टेम्पो
हा म्हणता ही बातमी वाऱयासारखी देवरूख शहरात पसरली.नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकच हाहाकार उडाला.नागरिकांनी आपल्याकडचे पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. म्हणून फवारणीसाठी टेम्पोत पाणी भरलेल्या टाक्या मागविण्यात आल्या नागरिकांच्या प्रयत्नांना दीड तसाने यश आले. नागरिकांबरोबर देवरूख पोलीस व नगरपंचायतीचे कर्मचारी घटनास्थळी होते.
या घटनेचा पंचनामा सोमवारी सकाळी महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सुदेश गोताड, मंडळ अधिकारी सुधीर यादव, तलाठी बजरंग चव्हाण उपस्थित होते.
देवरूखात अग्निशामक बंबच नाही
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे मोठी बाजारपेठ असून तालुक्याच्या कानाकोपऱयातून ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. देवरूख बाजारपेठ व परिसरात आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र या ठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. देवरूख नगरपंचायतीकडून अग्निशमन प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अग्निशमन बंब देवरूख नगरीत दाखल झालेला नाही. सद्य स्थितीत रत्नागिरी व चिपळूणच्या अग्निशमन बंबावर अवलंबून रहावे लागत आहे. हे दोन्ही बंब देवरूख नगरीत पोहोचण्यास 1 तासाचा कालावधी लागतो. या गंभीर बाबीकडे देवरूख नगरपंचायत प्रशासनाने लक्ष दय़ावे अशी देवरूखवासियांची मागणी आहे.









