वार्ताहर / देवगड:
देवगड तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिरगाव, पुरळ, मिठबाव, कुणकेश्वर, मोंड, वाडा, मुटाट, पाळेकरवाडी, वरेरी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. शिवसेना व भाजप असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही.
प्रतिष्ठेच्या शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये थेट भाजप व शिवसेना असा सामना रंगणार आहे. भाजपमध्ये असलेले माजी सभापती रवींद्र जोगल यांनी ऐन निवडणुकीच्या काळातच शिवसेनेत प्रवेश करत धक्का दिला. तसेच दोन बिनविरोध निवडून आलेले सदस्यही आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे. 11 सदस्यीय असलेले या ग्रामपंचायतीमध्ये आता 9 जागांसाठी लढत असून भाजप व शिवसेनेत खरी रंगत होणार आहे. दोन्ही बाजूने या ग्रामपंचायतीवर सत्ता आणण्याचा दावा आतापासूनच करण्यात येत आहे. पुरळ ग्रामपंचायतीमध्येही भाजप-शिवसेना असाच सामना रंगणार आहे. येथील पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर यांनी यापूर्वी या ग्रामपंचायतीच्या कारभारावर अनेकदा पंचायत समितीच्या सभांमध्ये ताशेरे ओढले होते. त्यामुळे याचा प्रभाव किती होतो यावरच सत्तेची समीकरणे ठरणार आहेत. तर जि. प. सदस्या वर्षा पवार आपल्या शिवसेनेचा प्रभावही दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणकेश्वर ग्रामपंचायतही राजकीयदृष्टय़ा चर्चेची ठरत आहे. काही महिन्यापूर्वीच शिवसेनेनी येथे पालकमंत्री, खासदार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घडवून आणला होता. शिवसेनेच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी या ग्रा. पं. वर सत्ता आणण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली असून भाजपनेही तेवढीच ताकद लावली आहे. मिठबाव येथील निवडणुकीत अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात. निवडणूक कोणतीही असोत नेहमीच चर्चेत राहणारे गाव म्हणून मिठबावची ओळख आहे. याठिकाणी थेट शिवसेना व भाजप असाच सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांचा गाव असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सर्वच प्रभागात दुरंगी लढत असून यावरूनच दोन्ही पक्षाचे बलाबल स्पष्ट होणार आहे. मोंड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप असा तिरंगी सामना आहे. मात्र, महाविकास आघाडी असल्यामुळे भाजप व अन्य पक्ष अशी लढत तेथे होणार आहे. माजी सभापती राजाराम राणे, भाजप जि. प. सदस्य गणेश राणे, राष्ट्रवादीचे अभय बापट या स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. जि. प. सदस्य गणेश राणे यांनी मोंडपार ग्रामपंचायत बिनविरोध आणली आहे. वाडा येथेही शिवसेना व भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहेत. पं. स. सदस्या पूर्वा तावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजप या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखणार का, हे पाहिले जात आहे. मुटाट व पाळेकरवाडी या दोन ग्रामपंचायती भाजपला महत्वाच्या आहेत. जि. प. सदस्य अनघा राणे व पं. स. सदस्य लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांचा हा मतदार संघ असून शिवसेनेनी जास्तीची ताकद या दोन ग्रामपंचायतीवर लावली आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींचे या दोन्ही ग्रामपंचायतीवर नजर असल्याचे दिसत आहे. वरेरी ग्रामपंचायत बहुतांशी भाजपकडे येण्याची शक्यता आहे. आता त्यांचे चार सदस्य बिनविरोध आले आहेत. केवळ एकाच सदस्याची सत्तेसाठी आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपने ही ग्रामपंचायतही प्रतिष्ठेची केली आहे. देवगड तालुक्यात चर्चेच्या या ग्रामपंचायती भाजप व शिवसेनेला त्यांचे तेथील राजकीय वजन दाखविणारे असेच ठरणार आहे.









