देवगड पं. स. सभेत सदस्य अजित कांबळे यांचा गंभीर आरोप : चार कर्मचाऱयांवर घेतला आक्षेप : सखोल चौकशीची मागणी
वार्ताहर / देवगड:
देवगड पंचायत समितीच्या जि. प. शिक्षण विभागामध्ये चार कर्मचाऱयांनी करोडो रुपयांची अफरातफर केली आहे. या रकमेमधून मोठे बंगले, गावाकडे स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे. शासकीय कर्मचाऱयांकडे एवढा पैसा आला कोठून, हाच मोठा प्रश्न आहे. या कर्मचाऱयांनी कोणत्या मार्गाने पैसा मिळविला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती दोषी कर्मचाऱयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सदस्य अजित कांबळे यांनी केली. तर तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा अद्यापही तयार झाला नाही. जिल्हय़ातील अन्य तालुक्यांचे आराखडे विभागाकडे प्राप्त झाले, अशी नाराजी सदाशिव ओगले यांनी व्यक्त केली.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती लक्ष्मण पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते. कांबळे यांनी देवगड शिक्षण विभागातील चार कर्मचाऱयांनी 2010 ते 2015 या कालावधीमध्ये मोठय़ाप्रमाणात आर्थिक अफरातफर केली आहे, याची माहिती प्राप्त झाली आहे. यातील काहींनी मोठमोठे बंगलेही बांधले. प्रॉपर्टीही खरेदी केली आहे. तसेच याच्या दर महिन्याच्या आर्थिक व्यवहाराची पडताळणी पाहता लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचेही दिसत आहे. एवढा पैसा या कर्मचाऱयांकडे कोणत्या मार्गाने येत होता. दर महिन्याला पगाराव्यतिरिक्त काहीच कमाई नसताना एवढी संपत्ती कशी प्राप्त होते, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या कर्मचाऱयांची नावे आपण ज्यावेळी चौकशी शासकीय स्तरावरून होईल, तेव्हा आपण देऊ, असा गौप्यस्फोटच सभागृहात केला. यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी या प्रकरणी गांभीर्याने पाहिले जाईल. तसे आपल्या या विधानानुसार सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले.
देवगड तालुक्यातील पाणी टंचाईचा आराखडा अद्यापही जिल्हाधिकाऱयांना प्राप्त झाला नाही. इतर तालुक्याचे आराखडे पाठविण्यात आले तरीही आपल्या पंचायत समितीकडून दिरंगाई होत आहे, असा आरोप ओगले यांनी केला. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने खुलासा करताना ब यादी ग्रामपंचायतींकडून प्राप्त नव्हती. आता सर्वच ग्रामपंचायतीकडून यादी आली आहे. येत्या दोन दिवसात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहीने हा आराखडा जिल्हाधिकाऱयांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. देवगड तालुक्यातील शालेय एस. टी. बस फेऱया सुरू करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. सदस्या शुभा कदम यांनी विजयदुर्ग देवगड ही वस्तीची बस सुरू करावी, अशी मागणी केली. पत्तन विभागाकडून मंजूर झालेल्या बंधाऱयांची कामे कांदळवनांमुळे करता येत नाहीत, अशी माहिती अधिकाऱयांना दिली. यावेळी सुनील पारकर व ओगले यांनी आक्षेप घेत कांदळवनांशी या बंधाऱयांचा काही संबंध येत नाही. असे पत्र असेल तर सादर करण्याची मागणी केली. तसेच ही मंजूर कामे कोणतेही कारण न सांगता सुरू करण्याची मागणी केली. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्यांना घरपोच प्राप्त होण्यासाठी आरोग्य विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावा, अशी सुचना तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके यांना ओगले यांनी केली. जि. प. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांची रिक्त जागा तातडीने भरणा करण्याची मागणी कांबळे यांनी केली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दहीबाव-इळये-कुणकेश्वर रस्ता करण्यात आला होता. काही भागात जमीन मालकांमुळे रस्ता डांबरीकरण होऊ शकला नाही. आता हा रस्ताही वाहतुकीस अयोग्य झाला असून त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी सुचना ओगले यांनी केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे नव्याने तयार रस्ते वर्षभरातच हा नादुरुस्त होतात, असा प्रश्न पूर्वा तावडे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील आठ मंजूर कामांची निविदा खुल्या झाल्या असून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची परवानगी वरिष्ठ विभागाकडून प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती शाखा अभियंता मोंडकर यांनी दिली.








