शहरात भव्य शोभायात्रा : खांडकेकर, स्नेहल शिदम, अनिल गवस, शरद केळकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी / देवगड:
येथील कंटेनर थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱया सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. तत्पूर्वी, देवगड वॅक्स म्युझियम ते कंटेनर थिएटर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात अभिनेते अभिजीत खांडकेकर व अभिनेत्री स्नेहल शिदम हे प्रमुख आकर्षण होते.
आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते अनिल गवस, शीतल शुक्ल, महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ. प्रियांका साळसकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, लक्ष्मण पाळेकर, कंटेनर थिएटर व्यवस्थापिका तन्वी चांदोस्कर आदी उपस्थित होत्या. शोभायात्रेमध्ये स्थानिक शाळा, विविध ग्रुप व मंडळांनी सहभाग घेतला होता. यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम तन्वी ग्रुप (शिक्षणाची दिंडी देखावा), द्वितीय आदर्श शाळा- जामसंडे (फळ प्रक्रिया देखावा), तृतीय जामसंडे हायस्कूल (होळीचा सण), उत्तेजनार्थ मिलिंद पवार प्राथमिक शाळा व वॅक्स म्युझियम यांना गौरविण्यात आले. यावेळी अभिनेते अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री स्नेहल शिदम व शीतल शुक्ल यांचा राजदत्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुमित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रमा नाडगौडा यांनी मानले.
अभिनेते शरद केळकर यांचा सत्कार
नुकत्याच सुपरहिट ठरलेल्या ‘तानाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद केळकर यांनी सायंकाळी उशीरा या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती दर्शविली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत त्यांनी उपस्थित देवगडवासीयांना साद घातली. ‘कंटेनर थिएटर’ची संकल्पना अतिशय सुंदर असून देवगडसमोर मुंबई ही ‘पाणी कम चाय’ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवगड तालुका मराठा समाजाच्यावतीने शरद केळकर यांचा सत्कार करण्यात आला.