सेन्सेक्समध्ये 243 अंकांची घसरण- आयटी समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शेअर बाजारात घसरणीचा सपाटा सुरूच राहिला आहे. मंगळवारीही त्याचा प्रत्यय आला. सुरूवातीला बाजाराने लसीकरणाच्या बातमीने स्थिरावून काही अंकांची वाढही दर्शवली होती. पण ही स्थिरता काही बाजाराला टिकवता आली नाही. सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 243 अंकांनी आणि निफ्टीही 63 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 243 अंकांनी घटून 47,705.80 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 63 अंकांच्या घसरणीसह 14,296.40 अंकांवर बंद झाला. एकंदर बाजारात आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी घसरण अनुभवायला मिळाली. आयटी क्षेत्राचा निफ्टी निर्देशांक 359 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट 30 पैकी 14 समभाग घसरण नोंदवत होते. अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 4 टक्के घसरणीत होते. याचप्रमाणे एचसीएल टेक आणि एचडीएफसीचे समभाग 3-3 टक्के घसरण नोंदवत होते. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह आणि डॉ. रेड्डिज लॅब्सचे समभागही 3-3 टक्के तेजी दर्शवत होते. बाजारात 1656 समभाग तेजीसह तर 1222 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 321 अंकांनी वधारून निर्देशांक 48,271 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 96 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 14,456 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स व ऍक्सिस बँक यांचे समभाग तेजीसह कार्यरत होते. सोमवारी पहिल्या दिवशी सेन्सेक्स 881 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 258 अंकांनी घसरला होता. देशभरात पसरत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे शेअर बाजारावर काल नकारात्मकता दिसून आली.









