मुंबई :
चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबरच्या दुसऱया तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी दर 7.5 टक्के इतका राहिला असल्याची माहिती शुक्रवारी नॅशनल स्टॅटिस्टीकल कार्यालयातून देण्यात आली. दुसऱया तिमाहीत 7.5 टक्के जीडीपी राहिल्याने परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे संकेत यातून स्पष्ट होत आहेत. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक डिसेंबरच्या सुरूवातीला होणार असून त्यात रेपो दर जैसे ठेवण्यात येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. महागाईची चिंता लक्षात घेऊन रेपो दरात कपात किंवा वाढ केली जाणार नसल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे.
रॉयटर्सच्या तज्ञांनी जीडीपी दर 8.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. पहिल्या तिमाहीअखेर अर्थव्यवस्था 23 टक्क्यांनी आक्रसली होती. सप्टेंबर तिमाहीअखेर वार्षिक स्तरावर पाहता कृषी क्षेत्र 3.4 टक्के आणि निर्मिती क्षेत्र 0.6 टक्केसह विकसित झालेले दिसले. सरकार सध्या कोरोनावरील लसीच्या वितरणाच्या तयारीत गुंतले असल्याने याचा परिणाम परिस्थिती सुधारण्यावर होत आहे. परंतु पुन्हा रुग्णवाढीने सरकारची चिंता वाढली आहे. वाहन, इतर वस्तू व रेल्वे मालवाहतुकीच्या माध्यमातून ग्राहकांची मागणी उत्सवी काळात वाढल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. भारताची कोरोना रुग्णांची संख्या 93 लाखावर पोहोचली असून जगाच्या तुलनेत पाहता अमेरिकेनंतर भारत हा दुसऱया क्रमांकावरचा देश ठरला आहे. दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था सुधारून जुलै-सप्टेंबर दरम्यान 4.6 टक्क्यांवर राहिली आहे.








