प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील दुसरी व दक्षिण भारतातील पहिली किसान रेल्वे बुधवारी अनंतपूर (आंध्रप्रदेश) ते दिल्लीदरम्यान धावली. शेतकऱयांचा कृषी माल कमी वेळेत इतर राज्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगावमधून हिरवा झेंडा दाखवून केले.
देशाच्या अर्थसंकल्पामध्ये किसान रेल्वेची घोषणा केली होती. नाशवंत कृषी माल मोठय़ा महानगरांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेळ लागत असल्याने शेतकऱयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे रेल्वेने पुढाकार घेऊन किसान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिली किसान रेल्वे महाराष्ट्र ते बिहारदरम्यान धावली. त्यानंतर आता दुसरी किसान रेल्वे आंध्रप्रदेश ते दिल्लीदरम्यान सोडण्यात आली आहे. शेकडो टन कृषी माल एकाचवेळी पोहोचत असल्यामुळे इंधनाचीही बचत होत आहे. उद्घाटनप्रसंगी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.









