द्वारकेतील लहान मोठे लोक सत्राजिताच्या घरी जाऊन त्याचा धिक्कार करून म्हणू लागले – सत्राजिता! आमच्या मुरारीचा श्रीकृष्णाचा वध तू केलास. तू स्यमंतकमणी चोरल्याचा आळ कृष्णावर घातलास. ते सहन न होऊन तो स्यमंतकमणी शोधण्यासाठी द्वारका सोडून गहन अरण्यात शिरला. तिथे विवरात शिरून तो प्राणाला मुकला. या सगळय़ा अनर्थाला तूच जबाबदार आहेस. तुझा धिक्कार असो! तेव्हा उद्धव, अक्रूरादी ज्ये÷ यादव लोकांची समजूत घालताना म्हणाले – विवेकाने वागा. उगीच शोक करू नका. कृष्ण परत यावा म्हणून काही अनु÷ान करा. त्याप्रमाणे ज्ये÷ ब्राह्मणांच्या सल्ल्याने दुर्गादेवीची आराधना करण्यात आली. वसुदेव, देवकी, रुक्मिणी व इतर यादवांनी दुर्गादेवीचे यथासांग पूजन केले. त्याने अंबा प्रसन्न झाली.
अंबेचिया आशीर्वचनीं । कृष्णागमन तेचि दिनीं ।
धन्य म्हणती श्रीभवानी । आम्हां निर्वाणीं पावली ।
जाम्बवतीतें देखोनी । म्हणती प्रत्यक्ष श्रीभवानी ।
आली कृष्णातें घेऊनी । आमुच्या स्तवनीं प्रकटली ।
जिहीं प्रसन्न केली अंबा । तया समस्त जनकदंबा ।
आश्चर्य झालें पद्मनाभा । सहित वल्लभा देखोनी ।
सलिलाब्धभिवललामललना । अपर इंदिरा इंदुवंदना ।
जाम्बवती ते दिव्याङ्गना । मधुसूदनासमवेत ।
प्रकट झाली अकस्मात । देखोनि द्वारकाजन समस्त ।
प्रसन्नवदनें उदो म्हणत । सिद्धी मनोरथ पावले ।
दुर्गा तुष्टली आम्हावरी । दुर्गमी रक्षूनि आणिला हरि ।
प्रसादा वोपिली दिव्य नारी । ते हे सुंदरी हरिरमणा।
सकळ स्वजनां प्रोत्साहित । निजागमनें आनंदवित ।
सिद्धी पाववोनी त्यांचे अर्थ । सदार भगवंत प्रकटला।
पद्ममुकुळें जेंवि समस्ते । सूर्योदयीं प्रफुल्लितें ।
तेंवि द्वारकाजनांचीं चित्तें । झालीं विकासितें हरिउदयीं ।
अंबेच्या आशीर्वादाने त्याच दिवशी भगवंताचे जाम्बवंतीसह द्वारकेत आगमन झाले. लोक म्हणू लागले – भवानी माता आम्हाला संकटात पावली. तिच्या कृपाप्रसादाने आम्ही धन्य झालो. जांबवंतीला बघून ते म्हणू लागले – प्रत्यक्ष भवानीच कृष्णाला घेऊन आली. आमच्या स्तवनाने ती आम्हाला पावली. ज्यांनी अंबा प्रसन्न करून घेतली होती ते माता, पिता व सर्व लोक कृष्णाबरोबर जांबवंतीला पाहून आश्चर्यचकित झाले. जांबवंती ही अत्यंत सुंदर दिव्यांगना कृष्णासोबत पाहून द्वारकावासियांनी अंबेचा उदो उदो म्हणून जयजयकार केला. ते म्हणू लागले – अंबा आमच्यावर प्रसन्न झाली. आमचे मनोरथ पूर्ण झाले. अंबेने श्रीहरीचे संकटात रक्षण केले आणि प्रसाद म्हणून ही दिव्य नारी त्याला दिली. सूर्य उगवल्यावर जशी सर्व कमळे विकसित होतात तसे श्रीकृष्णाच्या आगमनाबरोबर सर्व द्वारकावासियांची मने उल्हसित झाली. दु:खाची रात्र सरली. त्यांच्या मुखकमलावर तजेलता आणि उत्साह पुन्हा दिसू लागला.
मेलें परते स्वर्गींहून । तैसे कृष्णागमनें जन ।
परमानंदें झाले पूर्ण । दंपती देखोनि निवाले।
कंठदेशीं स्यमंतकमणि ।जाम्बवती लावण्यखाणी ।
एवं देखोनि चक्रपाणि । द्वारकाभुवनीं उत्साह ।
एक वांटिती शर्करा । एक हाकारिती द्विजवरां ।
कृष्णाप्राप्तीउत्साहगजरा । माजी देकारा करिताती ।
Ad. देवदत्त परुळेकर








