वृत्तसंस्था/ दुबई
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफानजीक निर्माण करण्यात आलेल्या एका 35 मजली इमारतीत आग लागली आहे. दुबईतील या 35 मजली इमारतीत सोमवारी रात्री उशिरा ही आग लागली आहे. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. संबंधित इमारतीला द एमार स्कायस्क्रॅपर नावाने ओळखले जाते. एमार डेव्हलपर्सने बुलवार्ड वॉक नावाने 8 टॉवर उभारले होते. द एमार स्कायस्क्रॅप याच इमारतींपैकी एक आहे. आग लागल्यावर इमारतीतील सर्व लोकांना सुरक्षित स्वरुपात बाहेर काढण्यात आले. 3 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविता आले. या दुर्घटनेबद्दल दुबई पोलीस तसेच एमार डेव्हलपर्सने अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुबईत अनेक गगनचुंबी इमारती आहेत. यातील अनेक इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत या इमारतींच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत.









