वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी येथील हॉटेल गोमंतकजवळ महामार्गावर दोन मोटरसायकलमध्ये अपघात होऊन सावंतवाडी येथील लॉन्ड्री व्यावसायिक कृष्णा गोविंद मडवळ (52 वर्ष) गंभीर जखमी झाले. त्यांच्या मुलालाही दुखापत झाली. मडवळ यांच्या हाता-पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी डॉ. खटावकर यांच्या हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दाखल केले. हा अपघात सकाळी 9.30 च्या सुमारास घडला. मडवळ हे आपल्या मुलासोबत मोटारसायकलने गोमंतक हॉटेलजवळील आपल्या लॉन्ड्रीमध्ये जात होते. त्यावेळी सावंतवाडी बाजारपेठेतून येणाऱया मोटरसायकलने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटारसायकलस्वाराने पलायन केले. जखमी मडवळ आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर पडले होते. मणियार यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. मोटारसायकलस्वाराचा तपास लागला नव्हता.









