प्रतिनिधी/ संकेश्वर
भरधाव दुचाकीची समोरुन येणाऱया महिंद्रा बोलेरा पिकअपला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील सिल्व्हर डेनजवळ घडला. पिंटू भिमाप्पा बोळण्णावर (वय 26 रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) व मंजुनाथ भिमाप्पा गुरव (वय 27 रा. नेर्ली, ता. हुक्केरी) अशी त्या दोघांची नावे आहेत.
पिंटू व मंजुनाथ हे दोघे दुचाकी क्र. के. ए. 23 ईएच 2358 वरुन संकेश्वरहून गडहिंग्लजकडे भरधाव जात आहे. सिल्व्हर डेनच्या वळणावर समोरुन येणाऱया पिकअप व्हॅनला त्यांची धडक बसली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर आपटल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी संकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळे यांनी भेट देवून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा हिटणी व नेर्ली येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातास कारणीभूत पिकअप वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









