संचारबंदी उल्लंघनाचे प्रमाण वाढल्याने निर्णय : न्यायालयात खटलेही दाखल करणार
सावंतवाडी:
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व ‘लॉकडाऊन’ असतांना विनाकारण दुचाकी घेऊन येणाऱयांवर दंडात्मक कारवाई करूनही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आता दंडात्मक कारवाई न करता संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करून दुचाकी जप्त करण्याची धडक कारवाई सोमवारपासून हाती घेण्यात आली आहे. सोमवारी दुपारपर्यंत 18 दुचाकीचालकांवर कारवाई करून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकीस्वारांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी दिली. गेल्या सहा दिवसात 38 दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सावंतवाडी शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या नेतृत्वाखाली गेले आठ दिवस शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासमवेत बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर चौकाचौकात जाऊन पाहणी केली. यापुढे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱयांवर गुन्हे दाखल करावेत. विनाकारण दुचाकीने फिरणाऱयांवर गुन्हे दाखल करून त्यांची दुचाकी जप्त करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना दिल्या.
दुपारी, रात्री फेऱया वाढल्या
दुपारी एक ते चार आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत पोलीस बंदोबस्त नसल्याचा फायदा घेत काही युवक दुचाकीवरून विनाकारण फिरत दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यातील अत्यावश्यक सेवेसाठी पास दिलेली वाहने सोडून अन्य वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसात सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालेल्या दुचाकींच्या मालकांचा शोध सुरू आहे. दोषी आढळल्यास दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे मौजमजा म्हणून शहरात फेरफटका मारू नका. पायी चालत या. आपल्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करा. पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही निरीक्षक खोत यांनी दिली आहे.
वृद्ध, बालकांची काळजी घ्या!
‘कोरोना’च्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा
प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत. या कालावधीत लहान मुलानी व वृद्धांनी काळजी घेणे गरचेचे आहे. संचारबंदी असताना अनेक वृद्ध खरेदीसाठी बाजारात फिरताना दिसत आहेत. तर लहान मुलांना त्यांचे पालक दुचाकीवरून बाजारात फिरण्यासाठी घेऊन येत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. वृद्धांनी घरातून बाहेर पडू नये. आपली औषधे मुलांकडे किंवा नातेवाईकांडे आणण्यास द्यावी. तसेच लहान मुलाना बाजारात आणण्याचे पालकांनी टाळावे, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.









