सुमारे 4.52 लाख हजारांच्या महागडय़ा गडय़ा जप्त, पुण्यातील शोरूममधील महागडय़ा दुचाकींची परस्पर विक्री, एक संशयित ताब्यात
प्रतिनिधी / नागठाणे
पुण्यातील दुचाकीच्या शोरूममधून महागडय़ा दुचाकींची परस्पर विक्री करुन लाखो रुपयांचा गंडा घालणाऱया घटनेचा बोरगाव पोलिसांनी शिताफीने पर्दाफाश केला. याप्रकरणी एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे 4.52 लाख रुपये किमतीच्या चार महागडय़ा दुचाकी जप्त केल्या आहेत. नितीन दिनकर सुतार (वय 35 रा. नागठाणे, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून तो पुण्यातील दुचाकी शोरूम मालकाच्या गाडीवरील विश्वासू चालक होता. त्याच्याकडून आणखी काही अशाप्रकारे परस्पर विक्री झालेल्या दुचाकींची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याला पुढील तपासासाठी खडकी (पुणे) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी नागठाणे येथील सासपडे चौकात कारवाई करत असताना एक युवक विना क्रमांकाची यामाहा एफ. झेड ही महागडी दुचाकी घेऊन जात असल्याचे आढळले. त्यांच्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे गाडीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्याची अधिक चौकशी केली.
चौकशीदरम्यान नितीन सुतार याने वाकडेवाडी (पुणे) येथील शेलार यामाहा शोरूममधून महागडय़ा दुचाकी चोरून त्यांची परस्पर विक्री केल्याचे कबूल केले. यावेळी बोरगाव पोलिसांनी त्याच्याकडून 4.52 लाख रुपये किमतीच्या तीन यामाहा एफ. झेड व एक फॅसिनो मोपेड बाईक अशा चार गाडय़ा ताब्यात घेतल्या.
नितीन सुतार हा पुण्यातील यामाहा शोरूमच्या मालकाच्या कारचा चालक म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर मालकाचा अत्यंत विश्वास असल्याने गाडय़ांच्या गोडाऊनच्या चाव्या त्याच्याकडे दिल्या होत्या. मात्र नितीन सुतारने विश्वासघात करत लॉकडाऊनच्या काळात या गोडाऊनमधून दुचाकी लंपास करत त्यांच्या परस्पर विक्री करत होता अशी माहिती यावेळी बोरगाव पोलिसांनी दिली. केवळ संशय आल्याने बोरगाव पोलिसांनी हटकल्यावर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली असून खडकी (पुणे) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, बोरगाव सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम व राजू शिखरे यांनी ही घटना उघडकीस आणली.









