राजापूर – पन्हाळे येथे अपघात : अन्य युवक गंभीर जखमी
कणकवली:
कणकवली येथून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीने जात असताना राजापूर तालुक्यातील पन्हाळे येथे झालेल्या अपघातात वरवडे-फणसवाडी येथील जयेश दिलीप जेशी (21) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला ओंकार गावकर (रा. वरवडे) हा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडला.
जयेश, ओंकार हे काही कामानिमित्त रत्नागिरीच्या दिशेने जात होते. पन्हाळे येथे चौपदरीकरण अर्धवट स्थितीत आहे, तेथे दुपदरीकरण रस्त्यावरून जाताना बहुधा ओव्हरटेक करण्याच्या नादात राजापूरच्याच दिशेने असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसली. मात्र, ट्रक चालकाला अपघाताची कल्पनाच न आल्याने तो तसाच पुढे निघून गेला. अपघातात जयेश याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या पाहणीत जयेश मृत्युमुखी पडल्याचे आढळले. जखमी ओंकारला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती समजताच वरवडे-फणसवाडी येथील हनुमंत बोंद्रे, भाई सादये, गणेश परब, नीलेश सादये यांच्यासह अनेकांनी राजापूर येथे धाव घेतली होती. त्यानंतर जखमी ओंकार याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयेशने बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले होते. नोकरीबाबत जयेश व ओंकार हे रत्नागिरीला जात असावेत, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जयेशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.









