प्रतिनिधी / संकेश्वर :
भरधाव दुचाकी गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुकन्या मल्लिकार्जुन भावीमनी (वय 57 रा. नमाजमाळ संकेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात बुधवार दि. 4 रोजी रात्री 10.30 वाजता नेसरी गार्डननजीक संकेश्वर-हुक्केरी रस्त्यावर झाला. या अपघातास कारणीभूत ठरलेला तो गतिरोधक गुरुवारी हटवण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की, सुकन्या व मल्लिकार्जुन हे दोघे पती-पत्नी आपल्या दुचाकीने कमतनूरकडून संकेश्वरकडे येत होते. ते नेसरी गार्डननजीक येताच गतिरोधक निदर्शनास न आल्याने वेगाने दुचाकी गतिरोधकावर आदळली. त्यामुळे मागे बसलेल्या सुकन्या दुचाकीवरुन रस्त्यावर आपटल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. संकेश्वर येथील समुदाय आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील केएलई इस्पितळात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.
तो गतिरोधक ठरला मृत्यूस कारणीभूत
शहरासह शहरानजीक असणाऱया राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने मोठे गतिरोधक घातले आहेत. परंतु या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने रात्रीच्यावेळी हे गतिरोधक नजरेस येत नाहीत. या अपघातासदेखील हा गतिरोधकच कारणीभूत ठरला. त्यामुळे पुन्हा अपघात होऊ नये यासाठी गुरुवारी तो गतिरोधकच हटविण्यात आला आहे. तथापि संबंधितांनी इतर गतिरोधकांवर पांढरेपट्टे आखावेत, अशी मागणी पुढे आली आहे.