नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डावखुरा मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली असून त्याला बहुतांशी प्रथमश्रेणी हंगामात खेळता येणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. आयपीएल स्पर्धेत कुलदीपचा केकेआर संघात समावेश होता. मात्र, दुखापतीमुळे ती स्पर्धा अर्ध्यावर सोडून त्याला मायदेशी परतावे लागले आहे.
‘संयुक्त अरब अमिरातीत सराव सत्रादरम्यान कुलदीपला गुडघ्याची दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना त्याचा गुडघा दुखावला. उर्वरित टप्प्यात त्याला खेळणे शक्यच नव्हते. त्यामुळे, त्याला मायदेशी पाठवले गेले आहे’, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले. कुलदीपवर मुंबईत शस्त्रक्रियाही केली गेली असून तो पुढील किमान 4 ते 6 महिने खेळू शकणार नाही, असेही वृत्त आहे.
मागील 2 वर्षात कुलदीप खूपच खराब फॉर्ममध्ये राहिला आहे. सिडनी कसोटीत डावात 5 बळी घेतल्यानंतर पुढे सातत्याने तो अपयशी ठरला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विदेशातील सर्वोत्तम भारतीय गोलंदाज, असा त्याचा उल्लेख केला होता. मात्र, कुलदीप खराब फॉर्ममधून प्रदीर्घ काळ मार्ग काढू शकला नाही. कानपूरच्या या 26 वर्षीय गोलंदाजाने 7 कसोटी, 65 वनडे व 23 टी-20 सामने खेळले असून सर्व क्रिकेट प्रकारात 174 बळी घेतले आहेत.









