मळगावात गोसावी कुटुंबात परंपरा
नीलेश परब / न्हावेली:
एक दिवसाचा, दीड दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती उत्सव आपण जाणतो. मात्र, नागपंचमी एक दिवसाची असते. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे दीड दिवसाची नागपंचमी गेली अनेक वर्षे सुरू आहे. गोसावी कुटुंबात नागाची पूजा दीड दिवस केली जाते.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला महत्वाचे स्थान आहे. पांरपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपसणारा व प्राणीमात्राविषयी प्रेम निर्माण करणारा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. नागपंचमीला पूर्वी महिला रानावनात जाऊन वारुळाजवळ नागदेवतेची पूजा करत असत. दूध, पातोळे असे पदार्थ ठेवले जात. महिला नागाला आपला भाऊ मानून त्याला वंदन करायच्या. मात्र, कालांतराने सापांना पकडून गारूडी खेळ करून पैसा मिळवू लागले. तसेच सापांची तस्करी होऊ लागली. त्यातूनच वारुळे कमी झाली आणि घरोघरी मातीच्या नागमूर्तीची पूजा होऊ लागली. ती आजपर्यंत सुरू आहे.
नागपंचमीला नागमूर्ती आणून तिला लाह्या चिकटवून दुधाचा व पातोळय़ाचा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचे विसर्जन करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेल्या या पंरपरेचा मान गोसावी यांना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोसावी व धर्मनाथ गोसावी नागपंचमीची तयारी करत आहेत. या अनोख्या उत्सवाची जपणूक करताना नागमूर्तीची सजावट आकर्षक केली जाते. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन, एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून सजवली जाते. त्यानंतर विधीवत पूजा केली जाते. सायंकाळी पुन्हा पूजा होते. दुसऱया दिवशी सकाळी दुपारी करंज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी अळवाच्या झाडात विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला जातो. अनेक वर्षे दीड दिवस पूजनाची ही परंपरा जपली जाते.









