अध्याय तेरावा
गुरूपासून दीक्षा ग्रहण करणे हा एक नवा जन्मच होय. उद्धवा ! गुरु हाच सर्वस्वी मायबाप आहे. प्रत्येकाला पाच प्रकारचे बाप असतात. एक जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा आणि तिसरा अन्न घालून सांभाळ करणारा. तसेच भयापासून सोडविणारा, बंधापासून मुक्त करणारा आणि देहाचे मरण चुकविणाराही शास्त्राप्रमाणे पिताच होतो. ह्याशिवाय एक पाचवा पिता आहे. तो पंचमहाभूतांचा निरास करतो, मृत्यूपासून सोडविणारा असतो व गर्भवासाचे दुःख निवारण करतो. ज्याचे चरण दृष्टीस पडले असता संसारबंधन पीडा देऊ शकत नाही, तो सद्गुरु म्हणजे पिता होय. तो भाग्याशिवाय मिळत नाही. म्हणून शिष्याला सद्गुरुच माता-पिता होत. तोच आपल्या ममतेने त्याला वाढविणारा असतो आणि अभिन्नभावनेच्या योगाने गुरुशिष्यांचे तादात्म्य होते. पूर्वी जे चार पिते सांगितले, ते ह्याचे सावत्र बाप होत असे समज, माता आणि पिता ही दोघेही भिन्नभिन्न असल्यामुळे त्यांना सख्खेपण ते कशाचे ? म्हणून दयाळू सद्गुरु असेल तोच सच्छिष्याचा सख्खा बाप होय. त्यामुळेच त्या पितापुत्रांमध्ये थोडा देखील विकल्प उत्पन्न होत नाही. त्या सद्गुरुपासून शैवी किंवा वैष्णवी दीक्षा प्राप्त होते अथवा तो गुरु आत्मज्ञानाने चैतन्यधन अशा निर्गुणाचा उपदेश देतो. आता दीक्षेबद्दल सांगतो. दीक्षा चारही पुरुषार्थ व चारही मुक्ति देते आणि अविद्येची स्थिती पूर्णपणे लयास नेते. आता ध्याननि÷ सात्वीकतेबद्दल सांगतो. ज्याचे शरीर सत्त्वोपाधिक आणि ज्याचे स्वरूप केवळ ज्ञानमय असते, तो श्रीविष्णु हाच सात्त्वीकांचा ध्यानविषय असतो. त्याचे ध्यान करावे. अथवा गाईच्या दुधासारखा शुभ्र किंवा कापुरासारखा गौर वर्ण ज्याचा आहे, तो पंचमुखी श्रीशंकर, संसारांतून तरून पलीकडे जाण्यासाठी ध्यानात आणावा. ह्या मूर्तीचे ध्यान करू लागले असता ध्येय, ध्यान आणि ध्याता हे सर्वच नाहीसे होते आणि अंतःकरणामध्ये ज्ञानस्वरूप ठसून राहते. सात्वीकतेचे ध्यान हेच होय. दीक्षा व ध्यान हे आध्यात्मीक सिद्धांत आहेत आणि ज्ञानस्वरूपाला पोचणे हेच त्या ध्यानाचे पर्यवसान आहे. सद्गुरु हे ज्ञानाचे भांडार असतात आणि हेच त्यांचे स्वरूप होय. म्हणून त्याचेच आत्मनि÷sने निरंतर अनुसंधान ठेवून ध्यान करावे. पंचभूतात्मक देहाची मूस करून त्यात ब्रह्मरूपी रस ओतला की, शोभिवंत गुरुस्वरूप तयार होते. त्या गुरुस्वरूपाचेच रात्रंदिवस ध्यान करावे. उद्धवा ! सात्त्वीकांचे ध्यान सद्गुरु आहेत हे लक्षात ठेव. आता मंत्राचे महात्म्य कसे असते तेही निरूपण ऐक. जी सर्व मंत्रांची माता, जी तत्काल ब्राह्मणाला द्विजपणा देते, त्या गायत्रीच्या मंत्राचे ग्रहण केले असता ब्राह्मणांना ब्राह्मणपणाचा अधिकार प्राप्त होतो. जी सर्व मंत्रांचा राजा आहे, जी ब्राह्मणांच्या वाटय़ास आली आहे, जिच्या धाकाने मला श्रीकृष्णालाही ब्राह्मणांची पूजा करणे भाग पडते, ती गायत्री ब्राह्मणांच्या हाती सहज आली आहे. तिची लोभिष्टपणाने उपेक्षा करून ब्राह्मण दरिद्री दशा पावले आहेत. गायत्रीवर नि÷ा ठेवणारा जो ब्राह्मण असतो, त्याचे चरण मला शिरसावंद्य आहेत. मंत्रांमध्ये गायत्रीमंत्र श्रे÷ आहे याला वेद प्रमाण आहेत. गायत्री मंत्राचा प्रवेश झाल्यावाचून इतर मंत्रांना वेदात प्रवेश करण्यास मुळी वावच नव्हता. मुख्यतः गायत्री मंत्राच्या ठिकाणी ते सर्व मंत्र वसती करून राहिले आहेत. गायत्री मंत्राचा संबंध नसेल तर ब्राह्मणांच्या मुखात वेद शिरूच शकणार नाहीत. मग इतर मंत्रांची गोष्ट काय सांगावी ? तात्पर्य, वेदांना गायत्री वंद्य आहे. गायत्री मंत्रांतील अत्यंत गुह्य म्हणजे ज्ञानस्वरूप परब्रह्मच होय. तो मंत्र ब्राह्मणांनाच सुलभ आहे. पण तेसुद्धा त्यातील वर्म विसरले. गायत्री मंत्र हा पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे व सर्व सिद्धींना उत्पन्न करणारा आहे. शैव किंवा वैष्णव मंत्रांचे ग्रहण केले, तरीसुद्धा गायत्रीमंत्रानेच तत्काल सत्त्वशुद्धि होते.
क्रमशः







