अनेक महिने कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना आता दिवाळी उत्सव आपण साजरा करीत आहोत. रितीरिवाजाप्रमाणे नवीन वस्त्रे परिधान करणे, अत्तर लावणे, सकाळी लवकर उठून सुगंधित उटणे अंगाला लावून अभ्यंगस्नान करणे, फराळाची मेजवानी, आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फुलांची सजावट या परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथा आपण पालन करतो. पण दिवाळी एवढय़ा पुरतीच मर्यादित आहे का? या सर्व उत्सवामागील उद्देश काय आहे व तो साध्य होतो का याचाही आपण विचार केला पाहिजे.
दिवाळी हा शब्द दीपावलीपासून आलेला आहे. दीपावलीचा अर्थ दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळी अथवा रांग अर्थात दिव्यांची रांग. उत्सव याचा अर्थ उत म्हणजे वर येणे सव म्हणजे दु:खातून अर्थात दु:खातून बाहेर येणे. दीप हा ज्ञानाचे म्हणजे प्रकाशाचे, आनंदाचे प्रतीक. सारांशाने दु:खातून बाहेर येऊन आनंद साजरा करणे. पण आपण दु:खातून केव्हा बाहेर येऊ शकतो हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आजच्या कलियुगात आपण आनंदाची परिभाषा विसरून गेलो आहोत म्हणून दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवणे, पत्ते खेळणे, जुगार खेळणे, पाटर्य़ा करणे इत्यादी गोष्टींना आपण आनंद मानतो. पण दिवाळीचा खरा आनंद आहे तो म्हणजे या दिवशी इतिहासात काय घडले ते समजून घेऊन त्याचा आनंद अनुभवणे. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, दसरा दिवाळी तोच माझा सण । सखे हरि जन भेटतील ।।1।। अमूप जोडियेल्या पुण्याचीया राशी । पार त्या सुखाशी नाही लेख ।।2।। धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामे ।।3।। तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेवू पायी संतांचिये ।।4।। अर्थात ज्या दिवशी मला प्रिय हरिभक्त भेटतील त्या दिवशी दसरा, दिवाळी हे दोन्ही सण एकत्र आले याचा आनंद होईल. अगणित पुण्याची राशीच प्राप्त झाली आहे कारण असा योग आज घडून आला. किती सुख झाले ते मोजता येत नाही. आजचा दिवस सोन्याचा झाला, मी धन्य झालो. त्या हरी भक्तांच्या संगतीने माझ्या वाचेला रामनामाचे उत्तम पीक आले. या संतांचे उपकार कसे फेडावे? म्हणून मी माझा जीव त्यांच्या चरणावर अर्पण केला आहे. आता संतांचा आणि दिवाळीचा काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात येईल. तर त्याचे उत्तर आहे आपल्या आनंदाच्या कल्पना या अज्ञानातून निर्माण होतात आणि परिणामी आपल्याला अज्ञानाच्या खाईत लोटून देतात. थोडक्मयात सांगायचे तर आपला मनुष्यजन्म या तथाकथित आनंदाच्या मागे लागून वाया जातो. खरेतर या उत्सवांच्या मागचे मूळ कारण आध्यात्मिक आहे पण त्याची आपल्याला कल्पना नसल्याने आपण संतांकडून त्या समजून घेतल्या पाहिजेत. म्हणूनच या अभंगात हरी भक्त भेटतील तो दिवस दसरा, दिवाळी आहे म्हटले आहे. याचा अर्थ हरिभक्तांकडून आपण दसरा, दिवाळी काय आहे ते समजून घेतले पाहिजे. श्रीमद् भागवत या ग्रंथानुसार दीपावली उत्सवाचे पाच दिवस हे श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहेत, त्यांचे थोडक्मयात वर्णन आपण येथे समजून घेऊ.
1. धनत्रयोदशी या दिवशी अमृत मंथनातून लक्ष्मी अवतीर्ण झाली आणि विष्णूच्या चरणाशी स्थित झाली. त्याचप्रमाणे विष्णूचा अवतार धन्वंतरी जे आयुर्वेदाचे प्रणेते आहेत तेही अवतीर्ण झाले. या उत्सवामागचा उद्देश आहे की लक्ष्मी म्हणजे धन हे केवळ भगवान विष्णूच्या सेवेसाठीच वापरले पाहिजे आणि आयुर्वेदाच्या मार्गदर्शनानुसार शरीराची जोपासना केली पाहिजे हे समजून घेणे.
2. नरक चतुर्दशी या दिवशी भौमासुर जो भूमिपुत्र आहे पण बाणासुर याच्या संगतीने बिघडला. तो नरकासुर या नावाने सुद्धा ओळखला जातो त्याला श्रीकृष्णांनी ठार केले आणि त्याने आपली कामवासना तृप्त करण्यासाठी बंदिवासात ठेवलेल्या 16,100 राजकन्यांची सुटका केली. त्यावेळी राक्षसांच्या सहवासात राहिल्याने त्या राजकन्यांना कोणी विवाह करण्यासाठी स्वीकारले नाही म्हणून श्रीकृष्णाने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. या घटनेद्वारे समजले पाहिजे की आपला जीव कामवासनेमुळे या जगात अडकला आहे त्यातून केवळ श्रीकृष्णच आपली सुटका करू शकतात.
3. दीपावली प्रभू रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे कपटकारस्थान करून अपहरण केले. त्यानंतर हनुमान, जांबवान इत्यादी वानर सैन्यासहित प्रभू रामचंद्रांनी लंकेवर आक्रमण करून रावणाचा वध केला आणि सीतेची मुक्तता केली. आजच्या दिवशी सीता राम लक्ष्मण हनुमान भरत हे सर्व जण अयोध्येमध्ये परत आले. म्हणून अयोध्यावासियांनी आकाश कंदील लावून, घरासमोर दिव्याच्या रांगा लावून, रांगोळय़ा काढून, आनंदाने नृत्य करत रामनामाचे कीर्तन करत प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले. या उत्सवामागची भावना आहे की आपणही या दिवशी आनंदाने आपल्या हृदयमंदिरात प्रभू रामचंद्रांना आमंत्रित करावे व त्यांच्या सान्निध्यात अयोध्यावासी राहिले तसे आपणही राहावे. या दिवशी श्रीकृष्णाला यशोदाने दही चोरले म्हणून उखळाला बांधून ठेवले होते, यासाठी कृष्णाचे एक नाव दामोदर आहे.
4. बली प्रतिपदा या दिवशी वामनदेव अवतीर्ण झाले आणि बलीमहाराजांना शरण आणले. बलीमहाराज हे शरणागतीचे प्रतीक मानले जातात. बलीमहाराजांप्रमाणेच आपणही भगवंताला कसे शरण जावे हे आजचा दिवस आपल्याला शिकवतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती 7 दिवस उचलून धरला होता. श्रीकृष्ण केवळ 8 वर्षाचे असताना त्यांनी एकदा आपले वडील नंदमहाराज याना इंद्राची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा सल्ला दिला कारण हा पर्वत वृन्दावनवासियांच्या गायींसाठी कोवळे स्वादिष्ट गवत आणि अन्नधान्य पुरवितो. आपली पूजा बंद झाल्यामुळे इंद्राला क्रोध आला आणि त्याने मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व वृंदावनवासियांना संरक्षण देण्यासाठी श्रीकृष्णांनी हा गोवर्धन पर्वत उचलला व त्याखाली सर्वाना आश्रय दिला. सात दिवसांनी इंद्राला कळून चुकले की श्रीकृष्ण हा केवळ छोटासा बालक नाही तर सर्व देवांचाही देव भगवान श्रीकृष्ण आहे. त्यावेळी इंद्राने माफी मागितली. हा गोवर्धन पर्वत म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा विस्तार आहे. म्हणून या दिवशी अनेक प्रकारचा नैवेद्य गोवर्धनला अर्पण केला जातो आणि संपूर्ण प्रदक्षिणा केली जाते यासाठी या उत्सवाला ‘अन्नकुट उत्सव’ असेही म्हणतात. या प्रसंगातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला निर्देशित करतात की जो श्रीकृष्णाची निस्सीम भक्ती करतो त्याला इतर देवदेवतांची उपासना करण्याची काही गरज नाही कारण सर्व देवदेवतासुद्धा प्रत्यक्ष श्रीकृष्णाची सेवा करण्यात धन्यता मानतात.
5. भ्रात्री द्वितीया अर्थात भाऊबीज भ्राता म्हणजे भाऊ. या द्वितीयेच्या दिवशी नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण 16,100 पत्नीसह द्वारकेला परतले तेव्हा त्यांची बहीण सुभद्राने त्यांचे स्वागत केले. आपल्या भावाला तिने कपाळावर विजयाचे प्रतीक म्हणून टिळा लावला, पुष्पहार अर्पण केला व गोड पदार्थ खाऊ घातले. त्याचप्रमाणे या दिवशी मृत्युपुरुष यमराज यांनी आपली बहीण यमुना हिच्या निमंत्रणाचा आदर करण्यासाठी तिची भेट घेतली. यमराजाचे यमुनादेवीने आरती ओवाळून, गोड पदार्थ देऊन स्वागत केले. तिच्या या सेवाभावाने संतुष्ट होऊन यमराजाने तिला वरदान दिले की आजच्या दिवशी यमुना नदीमध्ये जो स्नान करेल त्याला यमराज मोक्ष प्रदान करतील आणि पापातून मुक्तता करतील. याची आठवण म्हणून भाऊ आपल्या बहिणीच्या भेटीला जातो, क्षेमकुशल विचारतो व आध्यात्मिक मार्गदर्शन करतो. दीपावलीचे वरील सर्व उद्देश लक्षात ठेवले तर या उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल व ज्ञानमय प्रकाशाने आपले आयुष्य उजळून निघेल.
वृंदावनदास








