खडेबाजारमधील पथदीप दिवसाही सुरू ठेवण्यात आल्याने नागरिकांतून आश्चर्य
प्रतिनिधी /बेळगाव
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पथदीप सुरू करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपताच ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील पथदीप बंद पडले आहेत. हे पथदीप दुरुस्त करावेत, अशी मागणी होत असताना दुसरीकडे मात्र दिवसाही पथदीप सुरू ठेवले आहेत. त्यामुळे 24 तास पथदीप सुरू ठेवण्याची योजना मनपाने सुरू केली आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहर आणि उपनगरांतील पथदीप बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पथदीप सुरू करण्यात आले. नवे खांब उभारून पथदीप सुरू करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले. काही प्रमुख रस्त्यांशेजारील डेकोरेटिव्ह फुटपाथ लाईट बसवून शहराचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलग दहा-पंधरा दिवस सर्व पथदीप व्यवस्थित सुरू होते. मात्र, त्यानंतर बहुतांश मार्गांवरील पथदीप बंद असून, काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही हायमास्टही बंद पडले आहेत. रहदारीच्या रस्त्यांवरील पथदीप बंद झाल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. बंद पथदीप दुरुस्त करण्याकडे व ते सुरू ठेवण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. काही पथदीप दिवस-रात्र सुरू ठेवण्याचा प्रकार चालविला आहे. समादेवी गल्लीतील राजेंद्र प्रसाद चौक ते मध्यवर्ती बसस्थानक या खडेबाजार मार्गावरील सर्व पथदीप रविवारी दिवसभर सुरू होते. त्यामुळे 24 तास पथदीप सुरू ठेवण्याची योजना मनपाने हाती घेतली आहे का? अशी विचारणा होत होती. पथदीप दिवसाही सुरू ठेवण्यात आल्याने महापालिकेच्या या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले.









