नऊजणांची प्रकृती चिंताजनक : दोघांचा मृत्यू : सक्रिय रुग्णसंख्या 792 : मुख्यालयातील दोघे कर्मचारी बाधित
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा आणि मृत्यू होणाऱया रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. बुधवारी विक्रमी 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांत सिंधुदुर्गात तब्बल 539 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नऊजणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचारीवर्गात खळबळ उडाली आहे. मात्र कुणीही घाबरून जाऊ नये. संबंधित विभागातील सर्व कर्मचारी आणि संपर्कातील व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णसंख्या 7 हजार 761 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णसंख्याही 792 झाली आहे. बुधवारी वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. तसेच वैभववाडी येथील 35 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने बळी जाणाऱयांची संख्या 192 वर पोहोचली आहे. जिल्हय़ात 1 एप्रिलपासून गेल्या सात दिवसात तब्बल 539 रुग्ण वाढले आहेत, तर नऊजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हय़ात बुधवारी बरे झालेल्या 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यामुळे आतापर्यंत 6 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
दोघे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ
जिल्हाधिकारी कार्यालयामधील भू संपादन विभागातील एक कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कर्मचारीवर्गात खळबळ उडाली आहे. दोन्ही कर्मचाऱयांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 117, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 792, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण 6,671, मृत झालेले रुग्ण 192, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 7,661. चिंताजनक रुग्ण नऊ.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 671, दोडामार्ग – 390, कणकवली – 2236, कुडाळ – 1651, मालवण – 761, सावंतवाडी – 1018, वैभववाडी – 261, वेंगुर्ले – 634, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 39.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 156, दोडामार्ग -17, कणकवली – 152, कुडाळ – 140, मालवण – 114, सावंतवाडी – 97, वैभववाडी – 49, वेंगुर्ले – 60, जिल्हय़ाबाहेरील – सात.
तालुकानिहाय मृत्यू : देवगड – 15, दोडामार्ग – पाच, कणकवली – 50, कुडाळ – 36, मालवण – 19, सावंतवाडी – 44, वैभववाडी – 12, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने बुधवारी 797, एकूण 45 हजार 525, पॉझिटिव्ह आलेले नमुने 5196.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : बुधवारी 148, एकूण 31 हजार 306. पैकी पॉझिटिव्ह 2,566. तसेच नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात नऊ रुग्ण असून यापैकी ऑक्सिजनवर पाच, तर व्हेंटिलेटरवर चौघेजण आहेत.









