
नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
देशात कोरोनाचे थैमान सुरुच असून गुरुवारी पुन्हा एकदा 80 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत गेल्या 24 तासांत देशभरात 83 हजार 833 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,043 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 406 एवढी झाली आहे. 29 लाख 70 हजार 492 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 67 हजार 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहचण्यासाठी 110 दिवस लागले होते. तर एक लाखांपासून आठ लाखांपर्यंत रुग्णसंख्या पोहचण्यासाठी 53 दिवस लागले होते. मात्र, त्यानंतर रुग्ण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या दोनच दिवसात दीड लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असूनही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. मागील आठवडाभर एका दिवसात 60 ते 70 हजारपर्यंत रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुरुवारी त्यात मोठी वाढ होऊन 83 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.09 टक्क्यांवर
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात संक्रमण होत असून या राज्यात जास्त रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.09 टक्क्यांहून अधिक झाले आहे. गुरुवारपर्यंतच्या चोवीस तासात 68 हजार 584 रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
महाराष्ट्रात मृतांचा आकडा 25 हजारांच्या पार
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 25 हजार 195 झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 17,433 कोरोना रुग्ण नोंदले गेले. राज्यात दिवसभरात 292 जणांचा मृत्यू झाला. टाळेबंदीसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. कर्नाटकातही बाधितांचा आकडा 9 हजार 860 ने वाढला आहे. तसेच मृतांचा आकडा 113 ने वाढून सहा हजारच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
महाराष्ट्र, दिल्लीत मृतांचा आकडा सर्वाधिक
देशात एका दिवसातील मृतांचा आकडा सध्या हजारच्या आसपास असल्याचे आकडेवारीतून दिसते. गुरुवारपर्यंत मागील 24 तासात 1,043 बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 292, तामिळनाडूतील 98, दिल्लीतील 19, पश्चिम बंगालमधील 56, उत्तर प्रदेशमधील 74, गुजरातमधील 12, बिहारमधील 25 जणांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांपैकी महाराष्ट्रातील आकडा (25,195) सर्वाधिक असून त्याखालोखाल तामिळनाडू (7,516), कर्नाटक (5,950), दिल्ली (4,481), आंध्रप्रदेश (4,125) या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे.
चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ
मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल 11 लाख 72 हजार 179 चाचण्या करण्यात आल्या असून, आजपर्यंत देशात झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या आता साडेचार कोटींपेक्षाही पुढे गेली आहे. भारतातील दैनंदिन चाचण्यांची संख्याही जागतील सर्वाधिक चाचण्यांच्या संख्येपैकी एक आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने असे वृत्त दिले आहे. सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱया देशांच्या यादीत भारताचा समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.








