प्रतिनिधी / कोल्हापूर
दिवंगत गणपतराव देशमुख हे विचार आणि व तत्त्वांच्या चाकोरीतून जाणारे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. कष्टकर्यांसाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले, त्यामुळे जनतेने त्यांना प्रेम दिले, असे प्रतिपादन माजी आमदार शेकाप पक्षाचे जिल्हा चिटणीस, संपत बापू पवार पाटील यांनी केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख व माजी आमदार भाई राऊ धोंडी पाटील (शाहूवाडी) यांचे नुकतेच निधन झाले. या निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. सोमवार 2 रोजी दुपारी चार वाजता भारतीय शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात ही शोकसभा झाली.
संपत देसाई म्हणाले, गणपतराव देशमुख यांचा लोकसंपर्क एवढा मोठा होता, की पैसे वाल्यांच्या विरुद्धार्थी ते पैसे खर्च न करता 11 वेळा निवडून आले. भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सतीश कांबळे यांनी त्यांच्या साधेपणाची उदाहरणे दिली. अंनिसचे अनिल चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बाजू आमदार गणपतराव देशमुख यांनी विधानसभेत मांडल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. टी. एस. पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजेश वरक, राष्ट्रवादीचे आर. के. पवार, किसान सभेचे राज्य सेक्रेटरी नामदेव गावडे, कॉम्रेड बी. एल. बरगे, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, अरुण सोनाळकर, कॉम्रेड गिरीश फोंडे नागरिक कृती समितीचे रमेश मोरे, संभाजीराव जगदाळे, बाबुराव कदम इत्यादींनी भाषणातून श्रद्धांजली वाहिली. शोकसभेसाठी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.