ऑनलाईन टीम / पुणे :
जनसेवा व्यक्तीविकास प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय डाॅ.पतंगराव कदम सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला जातो. तसेच यंदापासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्वर्गीय डाॅ.पतंगराव कदम शैक्षणिक कृतज्ञता पुरस्कार देखील दिला जाणार आहे.
यंदाचा पहिला स्वर्गीय डाॅ.पतंगराव कदम शैक्षणीक कृतज्ञता पुरस्कार दिवंगत शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आणि जनसेवा व्यक्तीविकास प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश धिवार यांनी कळवली आहे.
स्वर्गीय पतंगराव कदम शैक्षणीक कृतज्ञता पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून सरस्वतीची मूर्ती आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, पी.आय.सी.टी चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर.एस. कोठावळे आणि प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार अरूण निगवेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. सर्व नियमांचे पालन करुनच हा घरगुती कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लवकरच आयोजित केला जाईल, असेही मुकेश धिवार यांनी कळवले आहे. अरूण निगवेकर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या उत्तुंग योगदान प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे.








