मुंबई / वृत्तसंस्था
बहरातील लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज (रविवार दि. 1) खेळवल्या जाणाऱया आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली संघाला सरस फलंदाजीची प्रामुख्याने अपेक्षा असेल. दुसरीकडे, लखनौचा संघ देखील आपण कर्णधार केएल राहुलवरच अति अवलंबून नाही, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करेल. उभय संघातील ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ मागील आठवडय़ात मिनी कोव्हिड आऊटब्रेक व नोबॉल वादंगामुळे पुरता तावून सुलाखून निघाला. पण, यानंतरही रिषभ पंत व त्याच्या संघसहकाऱयांनी केकेआरविरुद्ध 4 गडी राखून विजय संपादन करत आपली लय हरवू दिलेली नाही. या विजयामुळे दिल्लीचे मनोबल उंचावले. मात्र, धावांचा पाठलाग करताना मध्यफळी कोसळते, ही अद्याप या संघासाठी चिंतेची बाब ठरत आली आहे.
डेव्हिड वॉर्नर सातत्य राखत आला असला तरी त्याचा सहकारी पृथ्वी शॉ मात्र उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात फारसा यशस्वी ठरलेला नाही. तिसऱया स्थानी दिल्लीने कर्णधार रिषभ पंतसह अनेक पर्याय आजमावले. पण, अद्याप त्यांचा एकही फलंदाज यात स्थिरस्थावर होऊ शकलेला नाही. मिशेल मार्श क्वारन्टाईन पूर्ण करुन संघात परतला आहे. पण, येथे त्याला सूर सापडणार का, हे पहावे लागेल.
पंत स्वतः विस्फोटक डाव साकारण्यात अपयशी ठरत आला असून त्याच्यासह ललित यादव, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल यांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. केकेआरविरुद्ध 3 षटकात 14 धावत 4 बळी घेण्याचा पराक्रम गाजवणाऱया कुलदीप यादवचा कोटा पूर्ण करवून न घेतल्याने पंत यापूर्वी टीकेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. रोव्हमन पॉवेलने फिनिशर म्हणून उत्तम कामगिरी साकारली तर दिल्लीचा विश्वास सार्थ ठरु शकेल. त्या तुलनेत दिल्लीची गोलंदाजी अधिक बहरात राहिली आहे.
कुलदीप आपल्या सर्वोत्तम आयपीएल सीझनची अनुभूती देत आला असून आतापर्यंत त्याने 17 बळी घेतले आहेत. खलील अहमदही 6 सामन्यात 7.91 च्या इकॉनामीने 11 बळींसह किफायतशीर ठरला आहे. याशिवाय, मुस्तफिजूर, फिरकीपटू अक्षर व ललित आपली जबाबदारी चोख पार पाडत आले आहेत.
संभाव्य संघ
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.
लखनौसमोर प्ले-ऑफमधील स्थान निश्चितीचे मुख्य लक्ष्य
सध्या 9 सामन्यात 6 विजयांसह गुणतालिकेत तिसऱया स्थानी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचे संघाचे यापुढील पहिले लक्ष्य प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याचे असेल. अर्थात, सर्वोत्तम बहरातील केएल राहुलवरच अवलंबून राहणे त्यांच्यासाठी अडचणीत आणणारे ठरु शकते. हा संघ केएल राहुलवर इतका अवलंबून आहे की, ज्या तीन सामन्यात केएल राहुल अपयशी ठरला, त्या तिन्ही लढतीत संघाला पराभव पत्करावे लागले आहेत.
केएल राहुलने या हंगामात आतापर्यंत 2 शतके व एक अर्धशतक झळकावले असून तोच या संघाचा फलंदाजीतील कणा ठरत आला आहे. लखनौकडे क्विन्टॉन डी कॉक, आयुष बदोनी, दीपक हुडा व कृणाल पंडय़ा असे दर्जेदार खेळाडू उपलब्ध असून त्यांना जेसॉन होल्डर, स्टोईनिस या अष्टपैलू खेळाडूंची जोड आहे. याशिवाय, गोलंदाजीत दुष्मंता चमीराने देखील उत्तम चुणूक दाखवली आहे. पंजाबविरुद्ध कमी धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करण्याचा पराक्रम या संघाने गाजवला. रवि बिश्नोईची गोलंदाजी मात्र महागडी ठरत आली आहे.









