प्रतिनिधी /मडगाव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केंद्रातील भाजप सरकारने दिल्लीतील ख्रिश्चन बांधवांची चर्च पाडल्याचा आरोप काल बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी वार्का येथे आपल्या कार्यलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्यात जर दिगंबर कामत हे न्यायालयाच्या आदेशानंतरही हॉटेलच्या बांधकामावरील कारवाई रोखू शकता तर अरविंद पेजरीवाल चर्च पाडण्याचे काम का नाही रोखू शकले असा सवाल चर्चिल यांनी उपस्थित केला आहे.
चर्चिल आलेमाव पुढे म्हणाले की, न्यायालयाने जरी चर्च पाडण्याचा आदेश दिला असला तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने मंत्रीमंडळ बैठक बोलावून चर्च पाडण्याच्या कामाला विरोध करायला पाहिजे होता. तसा ठराव घेऊन तो न्यायालयाला सादर केला असता तर चर्चवरील कारवाई टळली असती.
चर्च पाडताना पूर्वी नोटीस जारी केलेली नाही. या चर्चमध्ये सुमारे 200 भाविक प्रार्थनेसाठी येत होते. या भाविकांनी आत्ता काय करावे, चर्चवर करण्यात आलेली कृती ही बेकायदेशीर होती. त्यातून दिल्लीतील व देशातील ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्याचे चर्चिल आलेमाव म्हणाले. चर्च संदर्भात केजरीवाल यांनी जी विधाने केलेली आहेत ती दिशाभूल करणारी आहेत असेही ते म्हणाले. गोव्यात मगो, काँग्रेस व भाजपची सरकार सत्तेवर आली परंतु, त्यांनी कधीच धार्मिक स्थळांवर कारवाई केलेली नाही. गोवा हे निर्धमी राज्य असून उद्या जर गोव्यात आपचे सरकार सत्तेवर आले तर येथील धार्मिक स्थळांवर वाईट परिस्थिती येईल असे चर्चिल म्हणाले.
‘सीझेडएमपी’ची सूनावणी गावांनी घ्यावी
सीझेडएमपीची सूनावणी ज्या पद्धतीने घेण्यात आली ती अत्यंत चुकीची होती. या सूनावणीच्या आधारावर जर आराखडा तयार केला तर त्याला विरोध केला जाईल. सरकारने सीझेडएमपीची सूनावणी गावांनी घ्यावी व स्थानिक लोकांची मते जाणून घ्यावी व त्यानंतर आराखडा तयार करावा असे चर्चिल आलेमाव यावेळी म्हणाले. आपण सीझेडएमपी सूनावणीच्यावेळी अनेक मुद्दे उपस्थितीत केले होते. या मुद्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात मच्छीमाऱयांची वेगळी गावे नाहीत
सीझेडएमपीच्या आराखडय़ात मच्छीमाऱयांच्या गावाचा उल्लेख केला जात आहे. पण, गोव्यात मच्छीमाऱयांची वेगळी गावे नसल्याचे चर्चिल आलेमाव म्हणाले. गोव्याच्या किनारपट्टी भागात मच्छीमार बांधव राहतात. ते वेगळे राहत नाही. त्यामुळे मच्छीमाऱयांची गावे असा जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.









