विलगीकृतांना प्राणवायूपातळी तपासता येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत कोरोना महामारीकरता उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे. कोरोना बाधितांमध्ये प्राणवायूची पातळी कमी झाल्याने त्रास वाढतो, अशा स्थितीत गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांना ऑक्सीमीटर दिला जाणार आहे. या बाधितांना दर 1-2 तासांनी स्वतःची तपासणी करता येणार आहे. प्राणवायूची पातळी कमी झाल्यास संबंधिताने रुग्णालयाला कळविल्यास वैद्यकीय पथक प्राणवायू सहाय्यासह त्वरित त्यांच्याजवळ पोहोचणार असल्याचे केजरीवालांनी सांगितले आहे.
मागील 10 दिवसांमध्ये दिल्लीत चाचण्यांचे प्रमाण तीनपटीने वाढले आहे. दिल्लीत यापूर्वी प्रतिदिन 5 हजार चाचण्या केल्या जात होत्या, आता हेच प्रमाण 18 हजारांवर पोहोचल्याचे केजरीवाल म्हणाले.
गंभीर रुग्णांमध्ये घट
12 जून रोजी दिल्लीच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून एकूण 5,300 बेड्स भरलेले होते. तर आजच्या दिवशी 6200 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 10 दिवसांत केवळ 900 बेड्स भरले आहेत. या 10 दिवसांमध्ये 23,000 नवे रुग्ण सापडूनही केवळ 900 अतिरिक्त बेड्सची गरज भासली आहे. नव्या रुग्णांमध्येही गंभीर प्रकृती असलेल्यांचे प्रमाण कमी आहे. सद्यकाळात 7 हजार बेड्स रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दिल्ली दुसऱया स्थान
दिल्लीत रविवारी रात्री बाधितांचा आकडा 59,746 झाला आहे. रुग्णसंख्येप्रकरणी दिल्ली आता दुसऱया स्थानावर पोहोचले आहे. दिल्ली सरकार 30 जूनपर्यंत 1 हजार रुग्णवाहिका तैनात करण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात 60 टक्के बेड्स राखून ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी उपाययोजनांच्या मुद्दय़ावरून गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे.
चीनशी दोन आघाडय़ांवर लढाई
केंद्र सरकारकडून राज्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. दोन्ही सरकारे मिळून कोरोनाशी लढत आहेत. ही वेळ भांडण-संघर्षाची नाही. आज पूर्ण देश चीनच्या विरोधात दोन युद्धे लढत आहे. एक विषाणूच्या विरोधात तर दुसरे युद्ध सीमेवर. विषाणूच्या विरोधात आमचे डॉक्टर, परिचारिका लढत आहेत. तर सीमेवर सैनिक लढत आहेत. जोपर्यंत विजय मिळत नाही, तोवर देश मागे हटणार नसल्याचे केजरीवाल म्हणाले.









