वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकटादरम्यान राजधानी नवी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. महिन्याभरात तिसऱयांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने चिंता वाढली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.5 इतकी होती. तसेच याचे केंद्र दिल्लीच्या गाजियाबादनजीक होते असे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी 12 आणि 13 एप्रिल रोजी देखील दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते.
12 एप्रिल रोजी दिल्ली एनसीआरमध्ये संध्याकाळी 5.50 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. कोरोना संकटाच्या काळात टाळेबंदीमुळे बहुतांश लोक घरातच असल्याने भूकंपासंबंधी चिंता वाढली आहे. 12 एप्रिलच्या धक्क्याची तीव्रता 3.5 इतकीच होती. तेव्हा भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या पूर्व भागात होते. 13 एप्रिल रोजी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यादिवशी रिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.7 इतकी होती. भूकंपाच्या अधिक तीव्रतेच्या दृष्टीकोनातून देशाला 5 क्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. दिल्लीचा समावेश अधिक तीव्रतेच्या चौथ्या क्षेत्रात होतो.









