पंतप्रधान मोदी सोमवारी दाखविणार हिरवा कंदील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या चालकरहित मेट्रोला हिरवा कंदील दाखविणार आहेत. डिसेंबर अखेरीस ही मेट्रो सुरु होईल असे अगोदरपासून सांगितले गेले होते मात्र त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या सेवेच्या माध्यमातून दिल्लीकरांना सरत्या वर्षाची मोठी भेट मिळणार आहे.
जनकपुरी वेस्ट ते नोएडा बोटॅनिकल गार्डनला जोडणारी 37 किमी मार्गाची ही मजेंटा लाईन देशातील स्वयंचलित चालकरहित मेट्रो आहे. याचवेळी एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवासासाठी पूर्ण परिचालन सुविधा असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. आत्तापर्यंत मेट्रोसाठी जे सार्वजनिक नियम होते त्यात चालकरहित मेट्रो ऑपरेशन व्यवस्थापनाचा समावेश नव्हता. त्यासाठी नियम बदलणे आवश्यक होते आणि त्यानुसार नवीन मेट्रो रेल्वे सामान्य नियम-2020 तयार केले गेले आहेत.
दिल्लीत दररोज सरासरी 26 लाख प्रवासी मेट्रो प्रवास करतात. दिल्ली मेट्रोची सुरुवात 25 डिसेंबर 2002 पासून झाली त्यावेळी उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते.
पहिल्या मार्गावर सहा स्टेशन होती. आता डीएमआरसी 242 स्टेशन, 10 लाईन्स ऑपरेट करते.









