गेल्या 15 दिवसात 117 मोबाईल जप्त ः 5 अधिकारी निलंबित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील तिहार, रोहिणी आणि मंडोली कारागृहात छापे टाकण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 117 मोबाईल जप्त करण्यात आले. याशिवाय चाकू, पेन ड्राईव्ह आणि काही चाव्याही सापडल्या आहेत. या कारवाईनंतर कारागृह विभागाने मंडोली कारागृहातील पाच अधिकाऱयांना निलंबित केले. कारागृहात असे प्रकार आढळून आल्यास केवळ कैदीच नाही तर संबंधित तुरुंग अधिकाऱयांवरही कारवाई केली जाईल, असे कारागृह विभागाचे डीजी संजय बेनिवाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. उपअधीक्षक प्रदीप शर्मा, उपअधीक्षक धर्मेंद्र मौर्य, सहायक अधीक्षक सनी चंद्रा, हेडवॉर्डर लोकेश धामा, हंसराज मीना अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱयांची नावे आहेत. गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीतील विविध कारागृहांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. कारागृहातील बंदी असलेल्या वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढेही शोधमोहीम सुरू ठेवण्याच्या सूचना कारागृह महासंचालकांनी दिल्याचे तुरुंग अधिकाऱयांनी सांगितले.









