गाझिपूरसह सिंघू, टिकरी बॉर्डर येथील अडथळे-दगड हटविले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश-दिल्लीदरम्यानच्या गाझिपूर सीमेवरून बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर येथील अडथळे आणि दगड हटविण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. अडथळे हटवल्यानंतर येथील मुख्य मार्गावरील वाहतूक अद्याप पूर्ववत सुरू झाली नसली तरी नजिकच्या काळात रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीहून हरियाणाकडे जाणाऱया टिकरी सीमेवरील एका लेनवरील बॅरिकेड्स हटवले होते.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील बॅरिकेड्स हटविण्याचे काम शुक्रवारी सुरू झाले होते. या कारवाईदरम्यान दिल्ली पोलीस अधिकाऱयांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. रस्त्यावरील मोठे दगड काढून बाजूला ठेवण्यात येत होते. तसेच बॅरिकेडिंगच्या वरील लोखंडी काटेरी कुंपण पोलीस स्वतः कटरने कापत असल्याचे चित्र दिसून येत होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही बॅरिकेड्स हटवत असल्याचे घटनास्थळी उपस्थित दिल्ली पोलीस अधिकारी सांगत होते.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱयांनी सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर (दिल्ली-हरियाणा) आणि गाझिपूर बॉर्डरवर (उत्तर प्रदेश-दिल्ली) धरणे आंदोलन केल्यापासून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आलेली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असल्यामुळे मागील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवरील अडथळे हटविण्याचे निर्देश दिले होते. आंदोलनाच्या नावाखाली शेतकऱयांना रस्ते अडवून ठेवता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
धान्य विकण्यासाठी संसदेत जाणार- टिकैत
दरम्यान, येथे सुरू असलेले आंदोलन हे तीन कृषी कायद्यांविरोधात आहे. आम्ही 11 महिने सीमेवर बसलो आहोत. आता रस्ते खुले झाल्यास आम्ही आमची धान्योत्पादने विकण्यासाठी संसद भवनातही जाऊ, असे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. यावेळी ‘शेतकरी त्यांचे पीक कुठेही विकू शकतात’ या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला टिकैत यांनी दिला. ज्या शेतकऱयांची पिके विकली जात नाहीत. प्रथम ते पीक ट्रक्टरमधून संसद भवनाजवळ नेऊन विकले जाईल. आम्ही कधीच रस्ता अडवला नाही. तसेच ते आमचे काम नाही. आमचा लढा तीन कृषी कायद्यांबाबत आहे, असे ते पुढे म्हणाले.
26 नोव्हेंबर 2020 पासून शेतकऱयांचे आंदोलन
तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने जात असताना दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना 26 नोव्हेंबर 2020 रोजी गाझिपूर सीमेवर बॅरिकेड्स लावून रोखले होते. त्या दिवसापासून सीमेवर तंबू ठोकून गाझिपूरप्रमाणेच सिंघू, टिकरी आणि शाहजहानपूर सीमेवरही शेतकरी गेल्या 11 महिन्यांपासून धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशभरातील विविध कृषी संघटनांचा पाठिंबा आहे.









