अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान : गुगल, यु-टय़ूबवरून मिळविली माहिती
दिल्लीच्या सोनिया विहार येथे राहणाऱया शशी शर्मा यांनी शेण हेच आपल्या उत्पन्नाचे साधन बनवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शशी गाईच्या शेणापासून दिवे, उदबत्ती, धुप, मूर्ती बनवत असून, त्यामुळे तिला घरी बसून रोजगार मिळाला आहे.
शशीला दोन वर्षांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने शेणापासून दिवे बनवून रोजगार मिळवू शकतो, असे सांगितले होते. यानंतर तिने गुगल आणि यू-टय़ूबवरून यासंबंधी माहिती मिळवली आणि स्वतः घरी उत्पादने बनवायला सुरुवात केली. प्रारंभी शशीने उदबत्ती बनवली. त्यानंतर लोकांच्या मागणीनुसार दिवे आणि मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यांच्या शेजारी राहणाऱया अनेकांकडे गायी आहेत. शशीने तिच्या गरजेनुसार त्यांच्याकडून 25 रुपये प्रति बादली या दराने शेण खरेदी करते.

गाईच्या शेणापासून शशी दिवे, उदबत्ती, मूर्ती, हार, लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती बनवतात. यासोबतच त्या लवंग आणि कापूर जाळण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये प्रसाद ठेवण्यासाठी वाटय़ा तयार करतात. नवरात्री आणि श्रावण काळात याला खूप मागणी असते. नवरात्री आणि दिवाळी दरम्यान, त्यांना जास्त काम मिळत असल्याने खूप फायदा होतो. होळीच्या सुरुवातीपासून दिवाळीपर्यंत अधिक काम असते. आणि होलिका दहनासाठी शेणाच्या हारांना मागणी असते.
गेल्या दोन वर्षातील त्यांचे काम पाहून इतर अनेक महिलांनाही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. सोनिया विहारसह आजूबाजूच्या जवळपास 50 महिलांना त्यांनी कामाला लावले आहे.









