मुश्ताक अली करंडक : आंध्रवर 6 गडय़ांनी विजय
मुंबई : सईद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दिल्लीने सलग दुसरा विजय नोंदवताना इलाईट गट ई मधील सामन्यात आंध्र प्रदेशचा 6 गडय़ांनी पराभव केला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर आंध्रला 20 षटकांत 9 बाद 124 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करीत आंध्रला माफक धावसंख्येवर रोखण्यात यश मिळविले. प्रदीप सांगवानने 33 धावांत 3 बळी मिळविले. त्यानंतर कर्णधार शिखर धवन (5) लवकर बाद झाला तरी दिल्लीने तीन षटके बाकी असताना विजयाचे उद्दिष्ट चार गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. आंध्रसाठी अश्विन हेब्बरने सर्वाधिक 32 धावा जमविल्या. मात्र अम्बाती रायुडू (1), केएस भरत (8) व रिकी भुवी (0) या आघाडी फळीला मात्र झगडावे लागले. त्यांची स्थिती एकवेळ 4 बाद 36 अशी झाली होती. अश्विनने थोडाफार प्रतिकार केल्यानंतर त्यांना शंभरी पार करता आली. दिल्लीच्या इशांत शर्माने 17 धावांत 2, सिमरनजीत सिंगने 21 धावांत 2 व ऑफस्पिनर ललित यादवने 22 धावांत 2 बळी मिळविले.
दिल्लीची देखील 2 बाद 10 अशी नाजूक स्थिती झाली होती. नितिश राणा (27), अनुज रावत (33) यांनी तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. हे दोघे बाद झाल्यानंतर हिम्मत सिंग (नाबाद 32) व ललित यादव (नाबाद 20) यांनी आणखी पडझड होऊ न देता दिल्लीचा विजय साकार केला. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 40 धावांची भागीदारी केली. दिल्लीने याआधी मुंबईचा पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक ः आंध्र प्रदेश 20 षटकांत 9 बाद 124 (अश्विन हेब्बर 32, सांगवान 3-33, इशांत शर्मा 2-17, सिमरनजीत सिंग 2-21), दिल्ली 4 बाद 128 (अनुक रावत 33, हिम्मत सिंग नाबाद 32, हरिशंकर रेड्डी 2-40).









