दरडोई उत्पन्न सिंगापूरइतके करण्याचे लक्ष्य – दिल्लीत मोफत लस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी 69,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला देशभक्तीच्या थीमवर सादर करण्यात आले आहे. मागील अर्थसंकल्पापेक्षा 2021-22 च्या अर्थसंकल्पात 4 हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पामध्ये 2047 पर्यंत दिल्लीचे दरडोई उत्पन्न सिंगापूरसमान करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस मोफत उपलब्ध करण्यात येईल. तसेच दैनंदिन लसीकरणाची क्षमता 45 हजारांवरून वाढवत 60 हजार करण्यात येणार आहे. दिल्लीतील शासकीय शाळांमध्ये देशभक्तीवर स्वतंत्र वर्ग ठेवण्याची घोषणा सिसोदिया यांनी केली आहे.
अर्थसंकल्पात देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष साजरा करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. हा जल्लोष 12 मार्चपासून सुरू होणार आहे. दिल्ली सरकार थोर क्रांतिकारक भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम सलग 75 आठवडय़ांपर्यंत आयोजित करणार आहे.
25 टक्के हिस्सा शिक्षणावर
दिल्ली सरकारने जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या लक्ष्याकरता 16,377 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. हा आकडा एकूण अर्थसंकल्पाच्या एक चतुर्थांश इतका आहे. अनधिकृत वस्त्यांच्या विकासाकरता 1,550 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरिबांसाठी नागरी क्षेत्र निर्माण करण्यासाठी ‘आवास विकास योजने’द्वारे सरकार 5,328 कोटी खर्च करणार आहे. यमुना नदीच्या सफाईसाठी 2,074 कोटी रुपयांची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी 9,934 कोटी तर परिवहनासाठी 9,394 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.









