अर्थसंकल्पात काशीसाठी मोठय़ा घोषणा शक्य – मुंबई-नागपूर मार्गे देखील चर्चेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मोदी सरकार स्वतःचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान प्रस्तावित पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम भले मंदगतीने सुरू असले तरीही सरकार आणखीन दोन बुलेट ट्रेन प्रकल्पांना लवकरच मंजुरी देऊ शकते. देशाची राजधानी दिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीदरम्यान देखील बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा आगामी अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षापासून आणखीन दोन बुलेट प्रकल्पांची सुरुवात होऊ शकते. 2022-23 च्या अर्थसंकल्पात दिल्ली-वाराणसी हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा होऊ शकते. याचबरोबर मुंबई ते नागपूरदरम्यान देखील बुलेट ट्रेन प्रकल्प घोषित केला जाऊ शकतो असे अधिकाऱयांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
नवी दिल्ली-वाराणासी बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी रेल्वेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मिळाला आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नोव्हेंबरमध्येच याच्याशी संबंधित डीपीआर रेल्वेला सोपविला आहे. मुंबई-नागपूर कॉरिडॉरचा सीडीआर अंतिम टप्प्यात असून आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारंभिक महिन्यांमध्ये तो रेल्वेला सोपविला जाऊ शकतो असे एनएचएसआरसीएलच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रारंभिक अनुमानानुसार दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन प्रकल्पावर सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर मुंबई-नागपूर कॉरिडॉरकरता याहून काही प्रमाणात खर्च येणार आहे. दिल्ली-वाराणसी, मुंबई-नागपूरसह आणखीन 5 बुलेट ट्रेन प्रकल्पांवरून डीपीआरसंबंधी काम सुरू आहे. सर्वकाही सुरळीत पार पडल्यास पुढील एक-दोन वर्षांमध्ये किमान 8 बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर काम सुरू होऊ शकते.









