जगातील सर्वाधिक प्रदूषित 50 शहरांमध्ये 35 भारतात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात प्रदूषित 50 शहरांपैकी 35 भारतातील आहेत. तर दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्वीस संघटना ‘आयक्यू एअर’द्वारे प्रसिद्ध ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट, 2020’मध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.
2019 च्या तुलनेत 2020 मध्ये दिल्लीतील वायू गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. तरीही दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये 10 व्या स्थानावर आहे. पण राजधानी शहरांचा विचार करायचा झाल्यास दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारत प्रामुख्याने दिसत आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित 30 शहरांपैकी 22 भारतातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीसह गाजियाबाद, बुलंदशहर, बिसरख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मेरठ, आग्रा आणि मुजफ्फरनगर ही उत्तरप्रदेशातील तर राजस्थानातील भिवाडी, हरियाणातील फरिदाबाद, जींद, हिसार, फतेहाबाद, बंधवाडी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धारुहेडा, बिहारमधील मुजफ्फरपूरचा यादीत समावेश आहे. अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर चीनचे शिंजियांग आहे. त्याच्यानंतर पहिल्या 10 पैकी 9 शहरे भारतातील आहेत.









