ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गाझियाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा दिल्ली – गाझियाबाद सीमा सील करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पास धारकांनाच गाझियाबाद मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता गाझियाबादमध्ये केवळ पास धारकांनाच सीमा ओलांडण्यास परवानगी असणार आहे. माल, वाहतूक, बँकिंग सेवा आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच पास घेणे आवश्यक असून सीमेवर तैनात पोलीस प्रत्येकाची चौकशी करतील आणि पोलिसांनी परवानगी दिल्यावरच गाझियाबादमध्ये प्रवेश दिला जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
यामध्ये डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पास ची आवश्यकता असणार नाही. ओळखपत्र दाखवून त्यांना प्रवेश दिला जाईल. या बरोबरच रुग्णवाहिकेला चोवीस तास प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दिल्लीच्या हॉटस्पॉट भागातून आलेल्यांना गाझियाबाद मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गाझियाबाद मधील हॉटस्पॉट भागातील लोकांना बाहेर जाण्यास मनाई आहे.