ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी सुधारणा कायद्यांविरोधात मागील 17 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात येत आहे. मागील 15 दिवसात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
पंजाबमधून दोन दिवसांत 15 हजारांहून अधिक शेतकरी कुंडलीच्या सीमेवर पोहोचले आहेत. केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या गर्दीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर डीसी श्यामलाल पुनिया यांनी जिल्हाभरात कलम 144 लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी 27 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग 44 च्या सीमेवर तळ ठोकून आहेत. पहिल्या दिवशी अंदाजे दोन हजार ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहने 25 हजार शेतकऱ्यांसह कुंडलीच्या सीमेवर पोहोचली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे 15 दिवसांत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पंजाबमधील शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांमधून दिल्लीत येत आहेत, त्याचप्रमाणे हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि इतर राज्यांतील शेतकरी पोहोचत आहेत.









