बेंगळूर
गुलबर्ग्याहून दावणगेरेकडे जाणाऱया कारमधून 1.47 कोटी रुपये जप्त करण्यात आले. दावणगेरे येथील के. आर. रस्त्यावरील गॅलक्सी शादी महालजवळ अझादनगर पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून महेश (वय 25), बिरलिंग (वय 23) व श्रीकांत (वय 26) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शनिवारी तिघेजण गुलबर्ग्याहून दावणगेरेकडे कारने येत होते. त्यावेळी दावणगेरे येथील गॅलक्सी शादी महालजवळ पोलिसांनी त्यांची कार अडवून चौकशी केली. दरम्यान, पोलिसांना संशय आल्याने वाहनातील तीन बॅगांची तपासणी केली असता यात 1.47 कोटी रुपये आढळून आले. यानंतर तात्काळ पोलिसांनी सदर तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे. पीएसआय जगन्नाथ, हवालदार अंजनेय, रवी, रुद्रेश गडिकेरी, पीआय तिम्मण्णा, गजेंद्रप्पा, अझादनगरच्या पीएसआय शैलजा यांनी ही कारवाई केली.









