दिल्ली, बेंगळुरुहून 109 प्रवाशांचे आगमन : अपेक्षित असलेली 13 विमाने प्रवाशांअभावी रद्द : टॅक्सी व्यवसायिकांमध्ये निराशा
प्रतिनिधी / वास्को
लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या काळानंतर काल सोमवारी देशांतर्गंत विमान वाहतूक सुरू झाली. मात्र, हवाई प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे दाबोळी विमानतळ आणि टॅक्सी व्यवसायिकांची निराशी झाली. एकूण पंधरा अपेक्षित विमानांपैकी केवळ तीन विमाने दिवसभरात दाबोळीत अल्प प्रवाशांसह दाखल झाली. बारा विमाने रद्द करण्यात आली. एकूण 109 प्रवासी काल दाबोळी विमानतळावर उतरले.
लॉकडाऊनच्या काळात दाबोळी विमानतळावर केवळ गोव्यात अडकून पडलेल्या विदेशी पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी आलेली खास विमानेच उतरली होती. तसेच कोरोनाविरूध्दच्या लढय़ात मदतकार्यासाठी काही विमानांनी हवाई वाहतूक केली होती. अन्यथा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दाबोळी विमानतळ ओस राहिला होता.
प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही
दि. 25 मे पासून देशांतर्गंत हवाई सेवा सुरू होण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी मिळाल्याने दाबोळी विमानतळावर व्यवसायिक हालचाली वाढल्या होत्या. आता हवाई वाहतूक सुरळीत होईल व व्यवसायांना गती येईल अशी अपेक्षा करीत दाबोळी विमानतळावर टॅक्सी व्यवसायिक सज्ज झाले होते. मात्र, कालच्या पहिल्याच दिवशी हवाई सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
पहिल्याच दिवशी दाबोळी विमानतळावर पंधरा विमाने आणि सुमारे दीड हजार प्रवाशी उतरतील, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली होती. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाने तशी व्यवस्थाही केली होती. विमानतळ प्राधिकरण, पोलीस, वाहतूक पोलीस, शासकीय अधिकारी तसेच टॅक्सी व्यवसायिक यांच्यामध्ये पूर्वतयारी आणि खबरदारीच्या उपाययोजनांसंबंधी दोन दिवसांपूर्वी विमानतळावर बैठकही झाली होती. मात्र, बहुतेक हवाई सेवा रद्द झाल्याने तसेच उतरलेल्या तीन हवाई सेवानाही अल्प प्रवाशी लाभल्याने विमानतळ प्राधिकरण व इतर सेवांवर फारसा ताण पडलाच नाही.
तीन विमानांतून 109 प्रवासी दाखल
विमानतळ प्राधिकरणाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 6 विमाने मुंबई व दिल्लीतून दाबोळी विमानतळाकडे येणार होती. मात्र, या हवाई सेवा प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आल्याने व्यवसायिक गटांची निराशा झाली. त्यानंतर दुपारी व संध्याकाळपर्यंत आणखी 9 विमाने दाबोळी विमानतळावर उतरणार होती. परंतु यापैकी केवळ तीनच विमाने दाबोळीवर उतरली. दुपारी दोनच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे पहिले विमान 45 प्रवाशांसह बेंगळूरहून दाबोळी विमानतळावर आले. दुसरे इंडिगो एअरलाईन्सचे विमान दिल्लीहून 33 प्रवाशांसह दाखल झाले. संध्याकाळी सातच्या सुमारास 31 प्रवाशांसह पुन्हा बेंगळूरहून एअर एशिया कंपनीचे विमान दाखल झाले. त्यामुळे दिवसभरात दाबोळी विमानतळावर उतरलेल्या तीन विमानांतून केवळ 109 विमान प्रवाशांचे आगमन झाले.
गोव्यातून 167 प्रवासी रवाना
दरम्यान, दुपारी दाखल झालेल्या एका इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातून 130 प्रवाशांनी दाबोळी विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण केले. तसेच संध्याकाळी दाखल झालेल्या एअर एशियाच्या विमानातून 37 प्रवाशांनी दाबोळीवरून बेंगळूरकडे प्रयाण केले.
टॅक्सी व्यवसायिकांच्या पदरी निराशा
युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचे उपाध्यक्ष सुदेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेला जवळपास अडिच महिने काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायापासून दूर होत्या. हवाई सेवा सुरू होत असल्याने टॅक्सी व्यवसायिकांनी पुन्हा सज्जता ठेवलेली आहे. या संघटनेच्या 350 टॅक्सी आहेत. पैकी विमानतळावरील पार्किंगच्या जागेत 15 टॅक्सी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. कोरोनापासून सुरक्षेसाठी मास्क, हातमोजे, सेनिटायझेशन, शारीरिक अंतर व अन्य खबरदारीबाबत सदस्यांना सतर्क करण्यात आले होते व तशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, दोन महिन्यांनंतर सुरू झालेल्या हवाई सेवेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने केवळ दोन गाडय़ांनाच व्यवसाय मिळाला. बहुतेक प्रवासी खासगी वाहनांनी आपापल्या स्थळी गेल्याची माहिती नाईक यांनी दिली. ताज व गोवा माईल्सचीही सेवा विमानतळावर उपलब्ध होती.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरोग्य पथक, पोलीस तैनात
दरम्यान, दाबोळी विमानतळावर उतरलेल्या देशी हवाई प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही विमानतळावर ठेवण्यात आला होता. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठीही खास सुविधा विमानळावरील बहुमजली पार्किंगच्या जागेत करण्यात आली होती. आरोग्य खात्याचे खास पथक व कर्मचारी विमानतळावर तैनात होते.