वार्ताहर / मौजे दापोली
दापोली तालुक्यातील साखळोली रस्त्यावर रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मनोज जामसुतकर असे जखमी झालेल्याचे नाव आहे. जामसूत नेहमीप्रमाणे दुचाकीवरून रविवारी दुपारी कामावर निघाले होते. ते साखळोली-कारिवणे नदीजवळील पूल पार करून समोरील वाकणापर्यंत आले असता बिबटय़ाचे दोन बछडे त्यांच्या दुचाकी समोरून रस्ता ओलांडून पुढे जात होती. बछडे गेल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता जामसुतकर पुढे निघाले असता अचानक झाडीतून बिबटय़ाने त्यांच्यावर झडप घातली. बिबटय़ाचा एक पंजा त्यांच्या पायावर जोरदार बसला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच जामसुतकर यांची भेट घेऊन माहिती घेतली. व बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी कार्यवाई केली जाईल, असे सूचित केले आहे. दरम्यान, याआधीची बिबटय़ा ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









