वार्ताहर/ मौजेदापोली
दापोली व खेड तालुक्यात सोमवारी सकाळच्या सत्रात अवकाळी पाऊस पडला. हवामान विभागानेदेखील रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास दापोलीत पावसाची रिपरिप, तर काहीठिकाणी जोरदार बरसात केली.
पावसाचे ढग दाटून आल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये सुकी लाकडे, गुरांची वैरण व इतर वस्तू भिजू नयेत म्हणून धावपळ सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. पावसामुळे उष्णतेच्या कचाट्यात सापडलेल्या दापोलीकरांना मात्र दिलासा मिळाला असला तरी आंबा बागायतदार धास्तावला आहे.
खेडमध्ये अर्धा तास रिपरिप
खेड प्रतिनिधीने दिलेली माहिती अशी की, तालुक्यासह शहरात सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. मेघगर्जनेसह अर्धा तास पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने काहीठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघातही घडले. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.