ऑनलाईन टीम / मुंबई :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपमानास्पद शब्द वापरणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत, तर राहुल गांधी हे सांड आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्ही आदर करतो. त्यांना बैल म्हणून दानवेंनी त्यांचा अपमान केला आहे. ज्या पंतप्रधानाना विकासपुरूष म्हणून संबोधतात, त्यांना बैल म्हणणाऱया रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.
तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची टीका नारायण राणेंनी केली होती, त्याविषयी राऊत म्हणाले, शिवसेना संघटना मजबूत करण्याचे उत्तम काम एकनाथ शिंदेंनी केले आहे. नगरविकास खात्यात त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. राणेंना मंत्री म्हणून पंतप्रधानांनीच काही अधिकार दिले नसावेत, म्हणून ते टीका करत असावेत, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.