सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीला लॉकडाऊन झाले आणि सर्व जग ठप्प झाले. सर्व वाहने, दळणवळण बंद झाले. त्यामुळे परप्रांतियांना आपल्या गावी जाण्यासाठी खूप हाल सोसावे लागले. अशावेळी अगदी सामान्यातल्या सामान्य माणसानेही आपल्या तोंडचा घास काढून दुसऱयाला दिला. आणि तिथेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. आपल्या देशात भारतीय प्राचीन संस्कृतीने दानाचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले आहे. त्यासंबंधीचा हा एक श्लोक- उत्तमोएप्रार्थितो दत्ते मध्यम: प्रार्थितो मतः। याचकैर्याच्यमानोएपि सोएधमाधमाधम:।। अर्थ:-उत्तम पुरुष न मागता देतात, मध्यम याचना केल्यावर देतात तर याचकाने याचना करूनसुद्धा जे देत नाहीत, ते अधमातील अधम आहेत.यात दान करणाऱयाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन प्रकार सांगितले आहेत. याचकाने न मागताच जो दान देतो तो म्हणजे कोणी साधुसंत असतो. दीन, दु:खी पाहताच त्याचे हृदय कळवळते व त्यांना मदत करायला तो धावतो. याचना केल्यावर जे दान देतात त्यांना मध्यम म्हणतात. म्हणजे एखाद्या संकटाच्या वेळी कोणी आवाहन केल्यावर ते मदत करतात. पैसा, सोने देतात, रक्तदान करतात, श्रमदान करतात, ते मध्यम होत. पण काही लोक असे असतात की, याचकाने मागणी केल्यावरही त्याला ते काही देत नाहीत. एखादा भुकेला माणूस दारात येऊन अन्नाची, पाण्याची याचना करू लागला तरी ते काहीही देत नाहीत. उलट त्याला हाकलून देतात म्हणजेच गरजू लोकांना जे मागूनही काही देत नाहीत ते अधम लोक होत. परंतु काही वेळा असे दिसते की एखादा दरिद्री माणूससुद्धा स्वतः उपाशी राहून दुसऱयाला दान करतो, त्याला स्वर्ग प्राप्त होतो. अशी दानाची महती सांगितली आहे. स्वर्ग कोणाकोणाला प्राप्त होतो हे सांगणारे एक सुभाषित आहे- दानम् दरिद्रस्य विभोश्च शान्तिर्यूनां तपो ज्ञानवतां च मौनम्। इच्छा निवृत्तिश्च सुखान्वितानां दया च भूतेषु दिवं नयन्ति।। अर्थ:- दरिद्रय़ाचे दान, सत्ताधीशांची शांती, युवकांचे तप, ज्ञानी माणसाचे मौन, सुखी माणसांचा इच्छात्याग, भूतमात्रावर दया हे गुण माणसांना स्वर्गात नेतात. दरिद्री माणूस स्वतः अन्नाला महाग असतो, तो दान काय करणार? त्याउलट श्रीमंताला दान करणे सोपे असते, पण आपण अर्धपोटी राहून दुसऱयाला घास देणारा खरा दानशूर. सत्ताधीश कधी शांत नसतो. त्याला अहंकार, कामक्रोध इत्यादी रिपू नेहमीच छळतात. मग तो शांत कसा राहणार? तरुण माणूस भोगाच्या मागे असतो. तो तप कधी करणार? तर ज्ञानी माणूस बऱयाच वेळा अहंकारी असतो, त्यामुळे तो मौन पाळणे कठीण तर सुखी माणसे इच्छा सोडणे अशक्मय. भूतमात्रावर दया करणे हे पुण्य आहे. म्हणून हे सारे गुण ज्याच्याजवळ आहेत. ते स्वर्गाला जातात आणि दुर्मिळ असतात. आपण या सर्वात कुठे बसतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.