कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कानपिचक्या
एक बाधितामुळे पूर्ण परिसरात पसरतोय संसर्ग, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मुक्त वावर
कोल्हापूर / कृष्णात चौगले
कोल्हापूर जिह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी कोल्हापूर गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी पहिल्या लाटेतील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना दुसऱया लाटेतील प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवले. चौथ्या टफ्फ्यातील निर्बंध कडक करण्याचे आदेश देताना कोल्हापूर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशाराही दिला. पवार यांच्या ‘दादा’गिरीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पण ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ म्हणून जनसामान्यांकडून प्रशासनाला सहकार्य होणार काय ? यावरतीही कोरोना विरोधातील लढाईचे यशापयश अवलंबून आहे.
कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. इतर जिह्यामध्ये रुग्णसंख्या घटत असताना कोल्हापूरात मात्र मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. जिह्यात दररोज 10 लाख लोकसंख्येमागे 944 लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. सध्या 12 हजार 569 रुग्ण बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 3 हजार 299 रुग्ण ऑक्सिजनविरहीत बेडवरती उपचार घेत आहेत. 2 हजार 370 रुग्णांवर ऑक्सिजन बेडवर उपचार सुरु आहेत. तर 699 रुग्ण आयसीयूमध्ये (व्हेंटीलेटर, एन.आय.व्ही, बाय पŸप, एच. एफ.एन.ओ आदी) उपचार घेत आहेत.
यापैकी 1 हजार 16 नागरीक संस्थात्मक अलगीकरण आहेत. तर 5 हजार 185 रुग्ण गृह विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत. पण गृह विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण आणि त्यांचे कुटूंबिय प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता गावातील अथवा प्रभागातील नागरीकांच्या संपर्कात येत आहेत. परिणामी संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करून इतर नागरीकांच्या संपर्कात येण्यापासून रोखावे असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाकडून जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. पण बाधित व्यक्तींनीही स्वत:हून संस्थात्मक अलगीकरण होणे आवश्यक आहे. तसेच ज्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी तत्काळ आपली कोरोना तपासणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत गृहा विलगीकरण होणे अपेक्षित आहे. केवळ उपमुख्यमंत्री कोल्हापूरात येऊन गेलेत म्हणून कोरोना आटोक्यात येणार नाही.
तरच कोरोनारूपी विळख्यातून कोल्हापूर मुक्त होईल
उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून निश्चितपणे हालचाली गतीमान केल्या जातील. पण प्रत्येक नागरीकांने ‘मी सुरक्षित,माझे कुटूंब सुरक्षित’ हे सुत्र मनामध्ये बाळगून प्रशासनाला सहकार्य केले तरच कोरोनाच्या विळख्यातून शाहूनगरी सुरक्षितपणे बाहेर पडेल. प्रशासनाच्या हातात सहकार्याचा हात दिल्यानंतरच कोरोना विरोधातील लढाईत विजयाची टाळी निश्चितपणे वाजणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात, त्यांनी तत्काळ तपासणी करण्याची गरज आहे. यामध्ये त्यांनी चालढकल केल्यास वैविध्यतेने नटलेल्या कोल्हापूरला कोरानारुपी रक्षसाची वज्रमुठ आणखी भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रशासनाने दक्षता समित्यांना बळ देण्याची गरज
शहर आणि गावातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभाग आणि ग्रामदक्षता समित्या कार्यरत आहेत. पण प्रशासनाने त्यासाठी ग्रामदक्षता आणि प्रभाग समित्यांना आवश्यक असणारे पाठबळ देण्याची गरज आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे तत्काळ काŸन्टŸक्ट ट्रेसिंग करून त्यांची कोरोना तपासणी करण्याची गरज आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन देऊन त्यांना पूर्ण ताकदीनिशी कार्यरत केल्यास कोरोनाच्या लाटेला निश्चितपणे थोपवता येईल.








