9 महिन्यात 381 टन खप ः मागणी कोरोनापूर्व स्थितीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीमध्ये चांगली वाढ दिसली असून कोरोनापूर्व परिस्थितीमध्ये मागणी पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दसरा दिवाळीच्या दरम्यान सोन्याची मागणी तर दमदार राहिली आहेच पण लोक लग्न समारंभासाठीही सोन्याची खरेदी मोठय़ा प्रमाणात करताना दिसत आहेत. सुमारे दोन वर्षाच्या खंडानंतर सराफी व्यवसायाला पुन्हा वेगाने व्यवसायामध्ये प्रगतीची संधी प्राप्त झाली आहे. यावषी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 381 टन इतक्मया सोन्याच्या दागिन्यांची मागणी करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सीलच्या अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
मागील वर्षातील मागणी
2021 मध्ये सोन्याची विक्री 346 टन इतकी झाली होती. त्याच्या मागच्या 2020 मध्ये हीच मागणी केवळ 179 टन इतकी होती. कोरोनामुळे निर्बंधाच्या कारणास्तव सराफी व्यवसाय जवळपास पूर्णपणे प्रभावित झाला होता. 2019 मध्ये मात्र दागिन्यांची मागणी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 396 टन इतकी नोंदवली गेली होती. ती पाहता यंदाची 381 टन सोन्याची मागणी पाहता परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे अधोरेखीत होत आहे. आगामी काळामध्ये लग्न समारंभासारखे महत्त्वाचे समारंभ होणार असल्याने त्यासाठीही सोन्याच्या दागिन्यांची मागणी ही वरचढच दिसणार आहे. आगामी काळामध्ये महागाई दर, डॉलरची स्थिती, तसेच जागतिक स्तरावरील विविध देशांमधील तणावाची स्थिती यानुसार मागणीचा कल आगामी काळात स्पष्ट होणार आहे. देशातील दागिने उद्योगातील कंपन्यांनी गेल्या तिमाहीत चांगली मागणी राहिली असल्याचे म्हटले आहे. यातील टायटनने दुसऱया तिमाहीत दागिने विक्रीत 18 टक्के वाढ दर्शवली आहे. तर दुसरीकडे कल्याण ज्वेलर्सलाही सप्टेंबरच्या तिमाहीत विक्रीतून 14 टक्के अधिक महसुल प्राप्त करता आला आहे.









