निकाल वाढीच्यादृष्टीने दर शनिवारी विद्यार्थ्यांना 10 गुणांची प्रश्नपत्रिका : सोमवारी पुन्हा पेपरची उजळणी : सातत्याने लेखन, वाचनचा सराव
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून दहावीचे वर्ग नियमित सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांकडूनही याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध शैक्षणिक कालावधीच्या आधारे विद्यार्थ्यांना परीक्षेच्यादृष्टीने तयार करण्याची जबाबदारी शैक्षणिक घटकांवर आहे. यामुळे शिक्षण विभागापासून शिक्षकांपर्यंत सर्वजण या तयारीत लागले आहेत. या दृष्टिकोनातून एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्याच्यादृष्टीने दर शनिवारी विद्यार्थ्यांना विषयनिहाय प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका (ब्लू प्रिंट) देण्याच्या सूचना करण्यात आल्या असून यामुळे विद्यार्थ्यांची घटकनिहाय उजळणी होण्याबरोबरच लेखनाची, वाचनाची सवय लागणार आहे.
कमी वेळेत अधिक उजळणी करण्याची संधी
बेळगाव शहर दरवर्षी निकालात पाठीमागे पडत असून निकाल वाढीच्यादृष्टीने गुगल मीटच्या माध्यमातून शुक्रवारी गटशिक्षणाधिकाऱयांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कमी वेळेत अधिक उजळणी करण्याची संधी मिळणार आहे. दर शनिवारी विद्यार्थ्यांना 10 गुणांची प्रश्नपत्रिका द्यावयाची असून रविवारी सुटीच्या दिवशी विद्यार्थी याचा अभ्यास करतील. सदर 6 विषयांच्या प्रश्नपत्रिका सोमवारी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत विद्यार्थ्यांकडून पुन्हा सोडवून घ्यावयाच्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका तात्काळ परस्पर विद्यार्थ्यांकडून अथवा सोयीनुसार शिक्षकांनी तपासून विद्यार्थ्यांना गुण सांगायचे आहेत.
प्रश्नपत्रिका तयार करताना 1 गुणांचे 3, 2 गुणांचे 2 व 3 गुणांचा 1 प्रश्न अशी गुणांची विभागणी करायची आहे. यामुळे विद्यार्थ्यांची बोर्डांच्या परीक्षेच्यादृष्टीने तयारी होणार आहे. विद्यार्थ्यांना सातत्याने परीक्षेचे वातावरण अनुभवायला मिळेल. शिवाय लेखनाची सवय लागेल. तसेच वाचन, पाठांतर, लेखन आणि परीक्षा यामुळे उजळणी होईल. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पूर्वपरीक्षा घेतली जाते. मात्र, तत्पूर्वी विद्यार्थ्यांचा सराव व्हावा म्हणून प्रत्येक आठवडय़ात सदर उपक्रम राबवून पूर्वतयारी केली जाणार आहे.
एसएसएलसी परीक्षा
14 जून ते 25 जून दरम्यान 2020-21 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी परीक्षा 14 जून ते 25 जून दरम्यान पार पडणार आहे. जानेवारीपासून वर्ग चालू झाल्याने सदर शैक्षणिक वर्षात कामकाजाचे दिवस कमी आहेत. मात्र, याच उपलब्ध कालावधीत दर आठवडय़ात विद्यार्थ्यांचा सराव व्हावा, तसेच सुटीत विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव सुटला असून लेखनाची सवय लागावी यासाठी सदर उपक्रम राबवून सर्व अंगाने विद्यार्थ्यांची दहावीची तयारी होईल, असा विश्वास गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.









