40 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा
प्रतिनिधी / बेळगाव
दहावीचा निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्हय़ाचा निकाल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणजे जिल्हय़ातील 40 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची 25 गुणांची परीक्षा घेण्यात येत असून अधिक निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे कमी आणि अधिक निकाल लागलेल्या शाळांच्या परस्पर सहकार्यातून शिक्षण विभाग निकाल वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
त्यानुसार शुक्रवारी जिल्हय़ातील 40 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच विविध अधिकाऱयांनी शाळांना भेटी देऊन सदर उपक्रमाची पाहणी केली. नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांना सदर परीक्षेच्या निकालाची माहिती एकत्रित करून आढावा शिक्षण खात्याकडे जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे निकाल वाढीसाठीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गतवर्षीचा निकाल कोरोना संकटामुळे कमी लागला होता. मात्र, यंदाचा निकाल चांगला लागण्याबरोबरच जिल्हय़ाचे राज्यातील स्थान उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा दत्तक, विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क, आठवडय़ातून एकदा परीक्षा, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शुक्रवारी 25 गुणांची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची अभ्यासाची काठीण्यपातळी तपासून निकाल वाढीसाठी पुढे काय प्रयत्न करावे लागतील, याचे नियोजन आखण्यात येत आहे.









